चंद्रशेखर बावणकुळे : महावितरणची आढावा बैठक, विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी १५० कोटीवर्धा : मुख्यालयी न राहणाऱ्या उर्जा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता तात्काळ बंद करावा. तसेच यानंतरही मुख्यालयामध्ये राहत नसल्यास निलंबित करून संपूर्ण घरभाडे भत्ता वसूल करण्याचे आदेश उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी गुरुवारी वर्धेत दिलेत. वर्धेच्या विकास भवनात त्यांनी उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अधिकाऱ्यांना होत असलेल्या कामाची माहिती जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीला देण्याची तंबी दिली. तर कामात हयगय करणाऱ्यांना थेट गडचिरोली पाठविण्यात येईल, असा दमही दिला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी वर्धेत महावितरणकडून होत असलेल्या त्रासाचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला.या सभेत त्यांनी कृषी पंपाच्या जोडणीकडे विशेष लक्ष दिले. आत्महत्याग्रस्त असलेल्या वर्धा जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असून जून २०१६ अखेरपर्यंत प्रलंबित असलेल्या सर्वच कृषी पंपांना वीज देण्यात येईल. याकरिता २५ कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील मागणीनुसार निधीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करून विद्युत यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली.ज्यांच्या शेतात पाण्याचे स्त्रोत आहे. अशा शेतकऱ्यांनाही वीज कनेक्शनचा पुरवठा करावयाचा आहे. तेव्हा असे शेतकरी शोधून काढण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी आणि अधीक्षक अभिंयता यांच्यावर सोपविलेली आहे. गरज असतानाही अद्याप वीज कनेक्शनची मागणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांचा स्थानिक लाईनमन, तलाठी, पटवारी यांच्या मार्फत शोध घ्यावा. महिनाभरात त्यांची यादी तयार करुन त्यावर स्थानिक खासदार व आमदारांची स्वाक्षरी घ्यावी. नंतर ती जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विकास भवन येथे वर्धा जिल्ह्यातील महावितरण व महापारेषण विभागांचा आढावा उर्जामंत्र्यांनी घेतला. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, अमर काळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, महावितरणचे संचालक अभिजीत देशपांडे, मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, अधीक्षक अभियंता शंकर कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे आदी उपस्थित होते.फिडर मॅनेजर योजना राबविणारशेती आणि गावासाठी एकच फिडर असल्यामुळे वीज पुरवठा करण्यास कमालीची अडचण निर्माण झालेली आहे. यावर उपाययोजनेचा भाग म्हणून फिडर मॅनेजर योजना राबवण्यात येणार आहे. शहरातील एका फिडरवर सुमारे चार हजार, तर ग्रामीण भागात सुमारे दोन हजार वीज कनेक्शन आहे. यातही मोटार लावणे, सर्व्हिस, खांब उभे करणे, लाईन टाकणे, रिंडिंग घेणे अशा सुमारे ८-१० बाबींसाठी तेवढे कंत्राटदार आहे. तरीही ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहे. यापुढे एक फिडर मॅनेजर आणि एक अभियंता या पद्धतीने यावर मात करण्यात येणार आहे. नागपूर विभागाची विभागणीमहावितरणच्या नागपूर विभागात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर ग्रामीण हे जिल्हे येतात. यामुळे एकाच मुख्य अभियंत्याला यावर नियंत्रण ठेवणे कसरतीचे होत असल्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यास अडचण निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी नागपूर शहर-वर्धा, चंद्रपूर-गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया असे स्वतंत्र विभाग करुन प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मुख्य अभियंता नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही ना. बावणकुळे यांनी यावेळी दिली.शेतात टॉवर उभारण्याला दंड करणारशेतात टॉवर उभारण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा पूर्ण मोबदला मिळाला नसेल, तर टॉवर उभारणाऱ्यांना दंड करा. जबरदस्तीने टॉवर उभारण्यासाठी पोलिसांनी मदत करु नये. शेतकऱ्याला मोबदला मिळाला, याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर टॉवर उभा करता येईल, असेही ना. बावणकुळे यांनी यावेळी स्पष्ट सूचना दिल्या.घरगुती सक्षम प्रकाश योजनेंतर्गत एलईडी दिव्यांचे वाटपविजेची बचत ही काळाची गरज असून घरगुती सक्षम प्रकाश योजनेंतर्गत जनतेने घरगुती वापरामध्ये मोठ्या प्रमाणात एलईडी दिव्यांचा वापर करावा, असे आवाहन ना. बावणकुळे यांनी केले. यावेळी घरगुती सक्षम प्रकाश योजनेंतर्गत वर्ध्यातील वीज ग्राहकांना एलईडी दिव्यांचे वाटप त्यांच्या झाले.
मुख्यालयी न राहणाऱ्यांची यापुढे गय नाही
By admin | Published: September 11, 2015 2:24 AM