लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे. याच संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, वेळप्रसंगी बेशिस्तांना काठीचा प्रसादही मिळणार आहे. ३६ तासांच्या संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासन कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करताच महसूल, पोलीस तसेच राजस्व विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मागील रविवारी संचारबंदीच्या काळात काही बेशिस्त विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. काही बेशिस्तांमुळेच वर्धा तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने संचारबंदीच्या काळात बेशिस्तांवर धडक कारवाई केली जाणार आहे. वर्धा शहर व शहराशेजारील १३ गावांमध्ये संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल, नगरपालिका तसेच राजस्व विभागाची एकूण १२ पथके सज्ज करण्यात आली आहेत. याच पथकांतील अधिकारी व कर्मचारी बेशिस्तांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणार आहेत. विशेष म्हणजे रविवारी वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपविभागीय न्यायदंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत.
प्रमुख चौकांत केली जाणार नाकेबंदी
संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाने केले आहे. पण, मागील रविवारी अनेक व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रविवार, २८ फेब्रुवारी रोजी कुणी व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी वर्धा शहरातील प्रमुख चौकांत पोलिसांकडून नाकेबंदी केली जाणार आहे.
२० व्यक्तींच्या उपस्थितीतच करता येणार लग्नसोहळा
रविवार, २८ फेब्रुवारी रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने काहींनी मंगल कार्यालये आरक्षित केली आहेत. असे असले तरी रविवारी जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू राहणार असल्याने या काळात केवळ २० व्यक्तींच्या उपस्थितीतच नागरिकांना लग्नसोहळे आटोपते घ्यावे लागणार आहेत.
विशेष पथकाचा राहणाच वॉच
संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे प्रत्येक मंगल कार्यालयात पालन केले जात आहे ना? याची शहानिशा करण्यासाठी मंडळ अधिकारी झामरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचारी रविवारी वर्धा शहर आणि शहराशेजारील ग्रा.पं.च्या हद्दीत असलेल्या प्रत्येक मंगल कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शिवाय बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.
परीक्षार्थ्यांनी ओळखपत्र ठेवावे सोबत
रविवार, २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाची परीक्षा आहे. या परीक्षार्थ्यांना संचारबंदीच्या काळात परीक्षा देण्यासाठी जाता येणार असले तरी प्रत्येक परीक्षार्थ्याने आपले ओखळपत्र सोबत ठेवणे क्रमप्राप्त आहे.
सक्तीच्या संचारबंदीच्या काळात वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करावे.
- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.