विविध संघटनांचा निर्धार : गावे पाणीदार करण्याच्या उपक्रमाला नवे बळवर्धा : पाणी फाऊंडेशन अंगर्तत असलेल्या स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावे सक्रिय सहभागी झाली आहे. या गावांतील नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासोबत श्रमदान करण्याचा निर्धार वर्धेतील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी येथे केला. आर्वी तालुक्यातील ७३ पैकी ५२ गावे पाणी फांऊडेशन अंतर्गत जलसंवर्धन स्पर्धेत सहभागी झालेली आहे. येथे गावकरी श्रमदान करीत आहे. या नागरिकांना श्रमदानदानातून सहकार्य करतानाच त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याच्या अनुषंगाने आज सायंकाळी येथील शासकीय विश्राम गृहात विविध सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला विविध संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. यावेळी सत्यमेव जयते वॉटर कप -२ मध्ये आर्वी तालुक्यातील ५२ गावांमध्ये जलसंधारणासाठी गावकऱ्यांच्या श्रमदानातून झालेल्या कामांचा लेखाजोखाच मांडण्यात आला. या गावांना आर्थिक मदतीची गरज नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र ही गावे पाणीदार होण्यासाठी गावकरी करीत असलेल्या श्रमदानाला आणखी गती यावी, या गावांचा जलसंधारणाच्या दृष्टीने कायापालट व्हावा, यासाठी या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना ही मंडळी केवळ आपल्या गावात पावसाचे पाणी वर्षभर टिकून रहावे, यासाठी दिवसरात्र एक करीत आहे. त्यांच्या श्रमाचे कुठेतरी कौतुक व्हावे, त्यांच्यासोबत श्रमदान करून त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आर्वीचे उपविभागीय अधिकारी शर्मा, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. अरुण पावडे, तहसीलदार विजय पवार, पाणी फाऊंडेशनचे मंदार देशपांडे यांनी मांडली. यावेळी उपस्थित सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी गावात जावून श्रमदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.(जिल्हा प्रतिनिधी)
‘त्या’ ५२ गावांचा उत्साह वाढवून श्रमदानही करणार
By admin | Published: April 25, 2017 12:57 AM