दोषींवर कार्यवाहीची मागणी : तहसीलदारांना साकडे आष्टी (शहीद) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेचा फिल्टर प्लॅन्ट द्रुगवाडा गावानजीक वर्धा नदीवर आहे. येथून साहूर, सावंगा (पुनर्वसन), धाडी या तीन गावांना पाणीपुरवठा होतो. नदीपात्रात मत्स उत्पादक संस्थेने मृत मासे फेकले. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरली असून याच दुर्गंधीयुक्त पाण्याचा ग्रामस्थांना पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मत्स्य उत्पादकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. नलदमयंती सागर मत्स्य उत्पादक तथा व्यवसाय मच्छिमार सहकारी संस्था, राजुराबाजार, जि. अमरावती यांनी येथे ८ सप्टेंबर ला हजारो मृत मासे पाण्यात फेकले. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. फेकलेल्या मृत माशांना पाहण्याकरिता येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नदीच्या पात्रात झुडुपे व शेवाळ वाढल्याने आधीच पाण्याला दुर्गंधी येते. त्यात मृत मासे टाकल्याने पाणी अधिक दूषित होत आहे.या नदीच्या पात्रातील दूषित पाणी नागरिकांना पाणी पुरवठा योजनेमार्फत देण्यात आले. हे पाणी पिण्यात आल्याने काहींचे आरोग्य बिघडले आहे. सदरया मत्स्य उत्पादा संस्थेने स्वत:च्या स्वार्थापायी मनमानी कारभार केला असून नागरिकांच्या जीवावर उठली आहे. याकरिता कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन भोरे यांनी निवेदनातून केली आहे. तहसीलदार सीमा गजभिये यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी राजेश ठाकरे, निरज भार्गव, आवेश खान, अजय लेकुरवाळे, सुरेश खवशी आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
मत्स्य उत्पादकांनी हजारो मासे नदीत फेकले
By admin | Published: September 15, 2016 1:08 AM