लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यात विकासाचा झंझावात सुरु असताना पंचायत समितीती पशू संवर्धन विभागाच्या कार्यालयाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही. या कार्यालयातील छत केव्हा कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल, याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहे.तालुक्यातील पशुंना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता झडशी, सालई, सुकळी, घोराड आदी ठिकाणी सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या. पण, पडझड झालेल्या सेलू पंचायत समितीच्या आवारात असलेल्या पशू संवर्धन कार्यालयाचे रुपडे पालटविण्याकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. या इमारतीच्या छतावरील कवेलू अस्ताव्यस्त असल्याने पावसाळ्यात छत गळतात. त्यामुळे इमारतीचे हे छत खिळखिळे झाले आहे. ते छत कधी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल याचा नेम राहिला नाही. अनेकदा येथील छताचा काही भाग हा टेबल व खुर्च्यावर पडलेला दिसून येतो. एखाद्यावेळी मोठा वारा सुटला की, इमारतीचे छत हलू लागते. त्यामुळे ते पडेल की काय? अशा भीतीतच कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सध्या या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच स्थिती पंचायत समितीतील इतरही विभागातील असल्याने कर्मचाºयांच्या जीवाची पर्वा नसल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे. खिळखिळ्या इमारतीतून चालणारा कारभार पाहता नवीन इमारत ही दिवास्वप्नच ठरत आहेत. पण, या कार्यालयाची तत्काळ दुरुस्ती केली नाही तर कर्मचाºयांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महत्वाचे दस्ताऐवज व साहित्यही असुरक्षित झाले आहे.दोन वर्षांपासून तुटलेल्या छताखाली चालतो कारभारपशू सवर्धन विभागाच्या कार्यालयात ज्या खोलीतून पशुधन अधिकारी विभागाचा कारभार चालवतात. त्याच खोलीतील छत मागील दोन वर्षापासून तुटलेले आहे. मात्र, अद्यापही दुरुस्ती केली नसल्याने छत पडल्यावरच दुरुस्ती केली जाईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पंचायत समितीमध्ये मागील सात वर्षापासून भाजपची सत्ता आहे. एकीकडे विकासाचा गवगवा केल्या जातो. परंतू ज्या कार्यालयातूनच कामकाज चालते ते शासकीय कार्यालय खिळखिळे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कार्यालयाला अच्छे दिनची प्रतीक्षा आहे.
पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:27 PM
सेलू तालुक्यात विकासाचा झंझावात सुरु असताना पंचायत समितीती पशू संवर्धन विभागाच्या कार्यालयाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही. या कार्यालयातील छत केव्हा कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल, याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहे.
ठळक मुद्देछत डोक्यावर कोसळण्याची भीती : दुरुस्तीची प्रतीक्षा