वर्धा : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष, तर दुसरीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याच्या घटना वर्धा आणि सावंगी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या. सावंगी हद्दीत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेत पीडिता ७ महिन्यांची गर्भवती असल्याने हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. या दोन्ही घटनांत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेत १६ वर्षीय पीडितेची आरोपी आशिष बोराडे (२५), रा. येळाकेळी याच्याशी ओळख झाली. दोघांनीही एकमेकांना मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण केली. पीडितेचे व आरोपीचे ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सूत जुळले. तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलू लागले होते. पीडिता शिकवणीला गेली असता आरोपी आशिषही तेथे गेला आणि पीडितेला दुचाकीवर बसवून बॅचलर रोडवरील एका कार्यालयातील खोलीत नेले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर स्वत: मरेल आणि तुलाही मारेल’, अशी धमकी देत अत्याचार केला. दोन ते तीन दिवसांनंतर आशिषने पीडितेला मोबाइल घेऊन दिला. ही बाब पीडितेच्या घरच्यांना माहीत झाल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार शहर पोलिसांत दिली. आरोपी आशिष बोराडे याला शहर पोलिसांनी तत्काळ अटक केली.
दुसरी घटना सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. १६ वर्षीय पीडितेला आरोपी विक्की उत्तम मसराम, रा. बोरगाव (नांदोरा) याने लग्नाचे आमिष देत तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात नेले असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार सावंगी पोलिसांत दाखल केली असता पोलिसांनी आरोपी विक्की मसराम यास अटक केल्याची माहिती दिली.
अत्याचारातील आरोपीचा अपघातात मृत्यू
लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार केल्याची घटना जामनी शिवारात घडली होती. याबाबतची तक्रार अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्यात पीडितेने दाखल केली होती. घटनास्थळ सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने प्रकरण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले होते. १८ सप्टेंबर रोजी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चंद्रशेखर शेळके, रा. कामठी खेरी, जि. वर्धा याने २५ वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. पीडितेला गर्भधारणा होऊन तिने बाळाला जन्म दिल्यावर आरोपीने लग्नास नकार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ज्या दिवशी सेलू पोलिसांत गुन्हा दाखल झाला, त्याच दिवशी आरोपी चंद्रशेखरचा अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.