वर्धा : वाळू घाटांचे लिलाव न झाल्याने वाळूचा अवैधरित्या उपसा करुन विना परवाना वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी वाळू चोरट्यांविरुद्ध मोर्चा उघडला असून दररोज कारवाई केली जात आहे. आजगाव शेत शिवारात देवळी पोलिसांनी २७ रोजी रात्रीच्या सुमारास कारवाई करीत विना परवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन ट्रॅक्टर ट्राॅलीसह ९ लाख १५ हजार २०० रुपयांचा वाळूसाठा जप्त केला. ट्रॅक्टर चालक अजय रामचंद्र चहारे, ट्रॅक्टर मालक प्रशांत दौलत वाडगुडे, मजूर श्याम नागोराव बैलमारे तिन्ही रा. वायगाव नि. असे वाळू चोरट्यांची नावे आहे.
भदाडी नाल्यातून वाळूचा वारेमाप उपसा सुरु असल्याची माहिती देवळी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आजगाव शिवारात नाकाबंदी केली असता ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता ट्राॅलीमध्ये वाळू भरुन असलेली दिसली. चालकाला परवाना व रॉयल्टीबाबत विचारणा केली असता चालकाकडे परवानाही नव्हता. पोलिसांनी एम.एच. ३२ एएच. ६६६३ क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्राॅली आणि १ ब्रास वाळू, फावडे, टिकास, मोबाईल असा एकूण ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गौण खनिज चोरीबाबतचा गुन्हा दाखल केला.