लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चार कोटीच्या खर्चातून बांधलेल्या व लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील शासकीय विश्रामगृहात एका धनाढ्य सेठजींच्या शंभराच्या घरात असलेल्या पाहुण्यांचा तब्बल तीन दिवसपर्यंत ठिय्या होता. विशेष म्हणजे, या पाहुण्यांच्या सेवेसाठी विश्रामगृहाचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करून ‘अतिथी देवो भव’चा परिचय दिला. आजच्या घटकेपर्यंत नवनिर्मित शासकीय विश्रामगृह देवळीतील कुणालाही उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जि.प. बांधकाम अधिकाऱ्यांची धनाढ्य सेठजींवर झालेली मर्जी चर्चेचा विषय ठरली आहे. अधिकाºयांच्या नियमबाह्य व मनमानी कारभाराबाबत नागरिकांत रोष व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.देवळीतील एका सेठजीच्या सहा कोटींच्या खर्चातून बांधलेल्या सुसज्ज बंगल्याचे वास्तूपूजन होते. मे महिन्याच्या सुरुवातीला असलेल्या या कार्यक्रमासाठी राजस्थान व इतर ठिकाणावरून पाहुण्यांची चांगलीच वर्दळ होती. त्यामुळे या पाहुण्यांच्या निवासाची व चहा-नाश्त्याची शाही व्यवस्था करण्याची जबाबदारी सेठजींवर होती. यासाठी नव्यानेच बांधलेल्या व मागील दीड वर्षापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय विश्रामगृहाची आवश्यकता होती. परंतु, विद्युत भरणा न केल्याने या विश्रामगृहाचा पुरवठा खंडित होता. या स्थितीत मार्ग काढून धनाढ्य सेठजींची मर्जी संपादित करावयाची होती. त्यामुळे संबंधीत बांधकाम अधिकाºयांनी तातडीने यंत्रणा हलवून वीजदेयकापोटी ३५ हजारांचा भरणा केला. मे महिन्याच्या सुरूवातीला या सर्व घडामोडी करून पाहुण्यांच्या सेवेत शासकीय विश्रामगृहाची दारे उघडण्यात आली. या विश्रामगृहातील दालनात एसीचे काम व्हावयाचे असल्याने १५ कूलरच्या माध्यमातून पाहुण्यांना गारवा देण्यात आला. चहा नाश्त्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली. या सर्व घडामोडी नियमाबाह्यरित्या करण्यात आल्या. विद्युत देयकाचा तडकाफडकी करण्यात आलेला भरणा सेठजींच्या पैशातून की बांधकाम विभागाच्या तिजोरीतून, याबाबत खमंग चर्चेला ऊत आला आहे. शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण होणे बाकी असल्याने संबंधित वास्तूची सेवा याआधी देवळीतील अनेकांना नाकारण्यात आली. सेठजींना मात्र ही सेवा देण्यात आली. या सर्व प्रकाराची चौकाचौकात चर्चा होत आहे. शासकीय विश्रामगृह मागील दीड वर्षापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. कधी लोकापर्णासाठी मंत्री मिळत नाही तर कधी तांत्रिक अडचणी सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे ५ वर्षांपासून येथील शासकीय विश्रामगृहाची सेवा बंद पडली आहे. यासाठी शासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.देवळी हे गाव राज्य महामार्गावर असल्याने तसेच याठिकाणी औद्योगिक वसाहत, केंद्र शासनाचा पॉवरग्रीड प्रकल्प व इतर महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे येथे शासकीय विश्रामगृहाची नितांत आवश्यकता आहे. या विश्रामगृहाच्या वास्तू बांधकामासोबतच वीजजोडणी, फर्निचरचे काम तसेच कापडी पडदे लावून अंतर्गत सजावटीची कामे पूर्णत्वास आली आहे. लोकार्पणाचे सोपस्कार तेवढे पूर्ण व्हावयाचे आहे. त्यामुळे वरिष्ठांनी व संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
विश्रामगृहात सेठजींच्या पाहुण्यांचा तीन दिवस ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:16 PM
चार कोटीच्या खर्चातून बांधलेल्या व लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील शासकीय विश्रामगृहात एका धनाढ्य सेठजींच्या शंभराच्या घरात असलेल्या पाहुण्यांचा तब्बल तीन दिवसपर्यंत ठिय्या होता. विशेष म्हणजे, या पाहुण्यांच्या सेवेसाठी विश्रामगृहाचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करून ‘अतिथी देवो भव’चा परिचय दिला.
ठळक मुद्देलोकार्पणापूर्वीच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप : तातडीची वीजजोडणी करून सेवेचा अतिउत्साहीपणा