वर्धा : वाद सोडविण्यास गेलेल्या दारूविक्रेत्याची तिघांनी चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वायगाव (नि.) येथील बसस्थानकासमोर असलेल्या रस्त्यावर अंडेविक्रीच्या हातगडीसमोर घडली. चेतन विष्णू घोडमारे असे मृतकाचे नाव आहे.
अवघ्या दहा रुपयांच्या कारणावरून हा वाद विकोपाला जाऊन ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले. तीन युवक गणेश त्र्यंबके याच्या हातगाडीवर अंडे खाण्यासाठी गेले. त्यांनी तीन अंडी खाल्ली. गणेशने अंड्याचे ४० रुपये झाल्याचे युवकांना सांगितले. एका युवकाने ५० रुपयांची नोट दिली आणि ३० रुपये घेण्यास सांगितले. या कारणातून गणेश आणि त्या तीन युवकांचा आपसात वाद झाला.
वादाचे रुपांतर हाणामारीत होत असतानाच दारूविक्रेता चेतन घोडमारे हा मध्यस्थी गेला आणि त्याने आरोपींना गरिबाचे पैसे का डुबवता, असे म्हणत पूर्ण पैसे देण्यास सांगितले. मात्र, संतापलेल्या तिघांनी चाकू काढून चेतनच्या पोटात भोसकून त्यास जखमी केले. यात गंभीररित्या जखमी चेतनला रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करुन अवघ्या काही तासांतच बबलूसिंग, सुंदरसिंग आणि करणसिंग नामक युवकांना देवळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.