पुलगाव : शासनाने सुंदर व स्वच्छ देशाची कल्पना डोळ्यासमोर ठेवून स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. नगर परिषद, शासकीय, निमशासकीय, संस्थांसह शाळा, महाविद्यालयांनीही स्वच्छतेच्या यज्ञात उडी घेतली; पण गत काही महिन्यात या अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. नगर परिषदेने सुंदर शहर, स्वच्छ शहर कल्पना साकारण्यासाठी अभियानास प्रारंभ केला. शाळा महाविद्यालयांनीही परिसरासह मोठे चौक स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. इतर संस्थांनीही या मोहिमेत सहभाग घेतला; पण गत काही महिन्यांपासून पालिकेचे या मोहिमेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. मुख्य बाजारपेठ गांधी चौक, धर्मशाळा, पं. दिनदयाल चौक, राठी मार्ग ज्ञानभारती विद्यालय आदी महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसते. गांधी चौक व स्टेशन चौकातील भाजी मंडईत सडक्या भाजीपाल्याच्या दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्यास धोका होण्याची शक्यता आहे.पालिकेत पूर्वी गल्ली-बोळातील नाल्यातील गाळ वा केरकचरा वाहून नेण्यासाठी एक चाकी लहान गाड्या होत्या. त्या भंगारात गेल्यानंतर आवश्यक ठिकाणी लोखंडी ढोले आले; पण या ढोल्यातच कचरा जाळला जात असल्याने तेही निकामी झाले. यानंतर स्वच्छता मोहिमेंतर्गत लावलेल्या लोखंडी कचराकुंड्याही लंपास झाल्या. प्रत्येक वॉर्डात घंटागाड्या फिरत होत्या. त्याच्या आर्थिक खर्चास शासनाची मंजुरी मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहे. पालिकेत सफाई कामगार आहे, ते ही नेत्यांच्या वा नगरसेवकांपलिकडे जात नाही. परिणामी, शहरात कचरा, नाल्यातील घाणीचे ढीग पडलेले दिसतात. महात्मा गांधी स्वच्छता अभियानात अनेकांनी छायाचित्रे काढून घेतली; पण आता तेही दिसत नाही. पावसाळा तोंडावर असल्याने पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)
शहरात स्वच्छता अभियानाचे तीनतेरा
By admin | Published: May 27, 2015 1:57 AM