वर्धा : बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष देत तिघांकडून पैसे उकळून तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना उजेडात येताच आर्वी पोलिसांनी १४ रोजी आर्वीतील एक चंद्रपुरातील दोन आणि अमरावतीचा एक अशा चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.नरसिंग रामेश्वर सारसार, रा. आर्वी, रजनी अंबादास चौधरी रा. चंद्रपूर, पंकज हरिदास झोडगे रा. अमरावती, अंबादास चौधरी रा. चौधरी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे.
नरसिंग सारसर याने रितेश राजेश टाक रा. आर्वी याला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर नोकरी लावून देतो त्यासाठी रजनी चौधरी यांना पैसे द्यावे लागेल असे सांगितले. रजनी चौधरी या वर्ध्याला येणार असल्याचे कळताच नरसिंग सोबत रितेश वर्ध्याला ५० हजा रुपये घेऊन गेला. वर्ध्यातील एका बॅंकेजवळ त्यांनी फॉर्म भरुन पासपोर्ट फोटो घेतले. दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे देखील रितेशने दिले. मात्र, तरी देखील नोकरी न लागल्याने रितेशने विचारणा केली रजनी चौधरी यांनी सध्या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जागा रिकामी नाही, असे सांगितले.
काही दिवसांनी पंकज झोडगे याने नरसिंग सारसर यांच्याकडे १ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, बॅंकेत वटविला असता धनादेश अनादरित झाला. काही दिवसांनी आर्वी येथील सावरकर याला देखील ८ लाख ५० हजार रुपयांनी, विरसिंग सारसर याची ५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे कळाले. त्यामुळे या चौघांनी नोकरी लावण्याचे आमिष देत तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार रितेश टाक याने आर्वी पोलिसात दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती दिली.
बुलढाणा येथे मारत होता चकरा...
रितेश टाक याला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. आर्वीवरुन तो बुलढाणा येथे गेला. मात्र, चौघांपैकी एकही जण त्याला भेटला नाही. अखेर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने याबाबतची तक्रार पोलिसात दिली.