लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक दुर्गा चित्रपटगृह मार्गालगतच्या तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने सदर तीनही छोट्या व्यावसायिकांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री घडली.प्राप्त माहिती नुसार, येथील बाजारपेठेतील दुर्गा टॉकिज मार्गावर लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात काही छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. याच दुकानांपैकी मृगेश साटोणे, हर्षाली साटोणे व किशोर साटोणे यांच्या दुकानाला रविवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. बघता-बघता आगीने या तिघांच्याही दुकानातील चप्पल, जोडे, बॅग, राख्या व इतर साहित्याला आपल्या कवेत घेतले.दुकानांमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय घटनेची माहिती वर्धा न.प.च्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत मृगेश साटोणे, हर्षाली साटोणे व किशोर सोटोणे यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.बहिणीच्या लग्नासाठीच्या पैशातून खरेदी केल्या राख्यायेत्या काही दिवसांवर नारळीपौर्णिमा असल्याने मृगेश याने सुमारे १ लाखांचा राख्यांचा माल विक्रीकरिता आणला होता. विशेष म्हणजे मृगेशच्या बहिणीचे लग्न जुळले असून लग्नसोहळ्यासाठी ठेऊन असलेल्या पैशातील काही पैसे त्याने राखी खरेदीसाठी वापरले होते. राखीचा व्यवसाय करून चांगला नफा मिळेल आणि हेच पैसे नंतर बहिणीच्या लग्नाकरिता कामी येईल, अशी आशा त्याला होती. परंतु, आगीत संपूर्ण राख्या जळून खाक झाल्याने मृगेशच्या अडचणीत भर पडली आहे.
दुर्गा चित्रपटगृह परिसरात तीन दुकानांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:19 PM
स्थानिक दुर्गा चित्रपटगृह मार्गालगतच्या तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने सदर तीनही छोट्या व्यावसायिकांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री घडली.
ठळक मुद्देशॉर्टसर्किटचा फटका : आठ लाखांचे नुकसान