विकास कामांना बाधा : आष्टीला येण्यास अधिकारी अनुत्सुकआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, राज्य तथा केंद्र शासनाच्या योजना राबविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय थाटण्यात आले. तालुका कृषी अधिकारी वर्ग दोन हे पदही निर्माण करण्यात आले; पण शहीदनगरीचे हे प्रमुख पदच गत तीन वर्षांपासून रिक्त आहे. येथे कुणीही अधिकारी येण्यास उत्सुक नसल्याची माहिती अधिकारी देतात. यामुळे विकास कामांत बाधा निर्माण होत आहे. राज्य शासनाने या गंभीर विषयाला संवेदनशील दृष्टीने हाताळून नियमित अधिकारी देण्याची मागणी होत आहे.पाणलोट व्यवस्थापन, जलयुक्त शिवार अभियान, केंद्र व राज्य पुरस्कृत गळीतधान्य, तृणधान्य, कडधान्य योजना राबविणे यासाठी नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती असणे गरजेचे आहे. तीन वर्षांपूर्वी बनन जुनघरे यांचा तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यकाळ संपल्याने ते काटोल जि. नागपूर येथे बदलून गेले. यानंतर आजपर्यंत येथील कार्यालयात नियमित तालुका कृषी अधिकारी देण्यात आला नाही. दरवर्षी अधिकारी प्रमोशन व भरतीमधून येतात; पण ते आष्टी येथे येण्यास स्पष्ट नकार देत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर दिली. तालुका कृषी अधिकारी पदच नवे तर येथील कृषी अधिकारी, दोन पर्यवेक्षक ही पदेही रिक्तच आहेत. राज्य शासनाच्या योजना राबविताना येथील दोन कृषी पर्यवेक्षकांवर लाच लुचपत प्रतिबंधक कारवाई केली. परिणामी, अन्य अधिकारी येथे येण्यास धजावत नसल्याची माहिती आहे. मंडळ कृषी अधिकारी अश्विनी भोसले यांना तात्पुरता तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. येथील कृषी कार्यालयात १ एप्रिलपासून नियमित अधिकारी मिळावा, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत कृषी आयुक्त पुणे यांना लेखी निवेदनही सादर करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
तीन वर्षांपासून तालुका कृषी अधिकाऱ्याविना
By admin | Published: March 13, 2016 2:28 AM