ऑनलाईन लोकमतवर्धा : पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पटविल्या प्रकरणी चंद्रशेखर मडावी रा. तामसवाडा याला जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी हा निकाल मंगळवारी दिला.घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, चंद्रशेखर मडावी हा त्याची पत्नी मिना हिच्या चारित्र्यावर संशय घेवून दारूच्या नशेत नेहमीच त्रास देत होता. दरम्यान २९ सप्टेंबर २०१३ च्या रात्री चंद्रशेखर याने मिनाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविले. यात ती १०० टक्के जळाली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चंद्रशेखरचेही हात जळाले. मिनाला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता ३० सप्टेंबर २०१३ रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण हांडे यांनी तपास पूर्ण करून ठाणेदार प्रवीण काळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता गिरीश व्ही. तकवाले यांनी एकूण सात साक्षीदार तपासत युक्तीवाद केला. या प्रकरणात मृतक व आरोपीची मुलगीच मुख्य साक्षीदार होती. तिने दिलेल्या बयानावरून न्यायालयाने आरोपीला भादंवीच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार संजय पडोळे यांनी साक्षीदारांना कोर्टात हजर केले.
रॉकेल टाकून पत्नीला जाळणाऱ्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:50 PM