स्पष्ट निर्देश नाही : कूपन असलेली ६,२५६ क्विंटल तूर अद्यापही कृउबासच्या यार्डवर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत वाढविली आहे. ही मुदत वाढविताना त्यांच्याकडून कुपन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईल अथवा नवे केंद्र सुरू करून तूर खरेदी होईल या संदर्भात कुठल्याही स्पष्ट सूचना नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यातही शेतकऱ्यांकडून प्रारंभी केवळ १ लाख क्विंटल तूर खरेदीचे संकेत दिल्याने पुढे ‘येरे माझ्या मागल्या’च होणार असल्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाफेडने तूर खरेदी बंद केल्यानंतर शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सुमारे दीड हजार रुपये नुकसान सहन करून व्यापाऱ्यांना तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यात शासनाने ज्या शेतकऱ्यांना कुपन दिले त्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा केली होती. यात राज्य शासनाच्या विदर्भ मार्केटींग फेडरेशन आणि महाराष्ट्र मार्केटींग फेडेशनच्यावतीने तूर खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. शासकीय खरेदी बंद झाली त्यावेळी सहा केंद्रांवरून १३ हजार ८८१ क्विंटल तुरीचे कुपन देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ७ हजार ५०७ क्विंटल तूर खरेदी झाली असून ६,२२८ क्ंिवटल तूर बाजारात आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात यंदा झालेल्या उत्पादनावरून सुमोर दीड लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे. केंद्राने तूर खरेदीला मुदतवाढ दिल्याने या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु या संदर्भात उपनिबंधक कार्यालयात स्पष्ट निर्देश आले नसल्याने नवे केंद्र उघडण्यात येणार आहे अथवा बाजार समितीच्या यार्डात असलेलीच तूर नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येईल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ६,८८८ शेतकऱ्यांकडून १.४२ लाख क्विंटलची खरेदी बाजारात तुरीची खरेदी सुरू होताच दर कोसळल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाच्यावतीने शेतकऱ्यांची तूर नाफेड आणि एफसीआय खरेदी करेल असे जाहीर केले होते. यानुसार जिल्ह्यात काही केंद्र सुरू झाले. या केंद्रांवरून ६, ८८८ शेतकऱ्यांकडून १ लाख ४१ हजार ९८४ क्विंटल तुरीची खरेदी झाली. यात नाफेडने हात वर केल्याने आता व्हीसीएमएफ व एमसीएमएफच्यावतीने खरेदी सुरू झाली आहे. कुपन दिलेल्या शेतकऱ्यांकडून या दोन्ही संस्था तूर खरेदी करीत आहे. आता केंद्राने तूर खरेदीला मुदवाढ दिली आहे. दिलेल्या मुदतीत नाफेडकडून तूर खरेदी होणार आहे. आता ही संस्था कुपन दिलेल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करेल की नव्याने केंद्र सुरू करेल या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीची मुदतवाढ दिल्याचे समजते; मात्र तसे परिपत्रक आले नाही. वाढलेल्या मुदतीत पहिले कूपन देवून असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईल किंवा नव्याने केंद्र सुरू करून शेतकऱ्यांकडून तूर खरेदी होईल या संदर्भात कुठल्याही स्पष्ट सूचना दिल्या नाही. यामुळे खरेदी संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. - जयंत तलमले, सहायक उपनिबंधक वर्धा जिल्ह्यात शासनापेक्षा व्यापाऱ्यांचीच खरेदी अधिक जिल्ह्यात नाफेडच्यावतीने तूर खरेदी झाली. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू कमी आणि बंदच अधिक राहिल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात व्यापाऱ्यांचीच खरेदी अधिक झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून १ लाख ८८ हजार ५३८ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. शासनाकडून योग्य निर्देष नसल्याने व्यापाऱ्यांची तूर खरेदी आणखी वाढणार असल्याचे संकेत दिसत आहे.
तूर खरेदीच्या मुदतवाढीने संभ्रमावस्था
By admin | Published: May 10, 2017 12:40 AM