महेश सायखेडे
वर्धा : गोचीड ताप म्हणजेच टिक फिव्हर. या आजारामुळे जनावरे चारा खात नाहीत. रवंथ करीत नाहीत. कातडीलगतच्या लीम्फ गाठीत सूज येते. शिवाय श्वासोच्छवास व हृदयाचे ठोकेही वाढतात. वेळीच उपचार न मिळाल्यास पाळीव जनावर दगावते. याच आजाराची लक्षणे आता मांस भक्षक वन्यजीवांत दिसून येत असल्याने जिल्ह्यातील वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाने वेळीच ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मागील अठरा दिवसांत जिल्ह्यातील विविध भागात तब्बल तीन बिबट्यांचामृत्यू झाला. वर्धा शहराशेजारील उमरी (मेघे) भागातून एका मादी बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू केल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण तापाने फणफणत असलेल्या या मादी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खरांगणा (मो.) नजीकच्या दिघी मौजातील पानवाडी शेतशिवारात ४ ऑगस्टला कपाशीच्या पिकात नर बिबट्याचा मृतदेह आढळला होता. तसेच ६ ऑगस्टला पानवाडी येथून अवघ्या दीड किमी अंतरावर असलेल्या नटाळा शेतशिवारात दुर्योधन देशभ्रतार यांच्या शेतात तापाने फणफणत असलेल्या एका मादी बिबट्याने अखेरचा श्वास घेतला.
या तिन्ही घटनांची नोंद वनविभागाने घेतली असली तरी या तिन्ही मृत बिबट्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात गोचीड असल्याचे प्राथमिक सूक्ष्म निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या तिन्ही मृत बिबट्यांचा शवविच्छेदन अहवाल अद्यापही वनविभागाला प्राप्त झाला नसून शवविच्छेदन अहवालानंतरच अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.
गोचीड ताप हा असंसर्गजन्य आजार
* गोचीड ताप हा असंसर्गजन्य आजार आहे. गोचीड ताप हा गाई आणि म्हशींमध्ये आढळणारा आदिजीवजन्य आजार आहे. तो आता शेळ्या आणि मेंढ्यामध्येही आढळून येतो.
* गोचीड ताप हा आजार थायलेरिया अन्यूलाटा, थायलेरिया ओरिएन्टालीस आणि थायलेरिया पार्व्हा या एकपेशीय आदिजीवामुळे होतो. या आजारास थायलेरियासीस असेही म्हणतात.
* हा आदिजीव रक्तपेशीमध्ये वाढून त्यांचा नाश करतो. जनावरांमध्ये पंडुरोग (एनेमिया)सारख्या अनेक व्याधी निर्माण होतात असे सांगण्यात आले.
भारतात वाहक जास्त
उष्णकटिबंधीय हवामानाच्या परिणामामुळे भारतात या आजाराचे वाहक अतिशय जास्त प्रमाणात आहेत. हायलोमा आणि रिफिसिफ्यालस प्रजातीचे गोचीड थायलेरिया परोपजीवीचे वाहक असतात. गोचीडमार्फत या आजाराचा प्रसार सर्वाधिक होतो. उपचाराने ठीक झालेली जनावरे या रोगाची दीर्घकाळ वाहक असतात असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
आजाराचा प्रादुर्भाव ऋतुमानाप्रमाणे बदलणारा
टिक फिव्हर या आजाराचा प्रादुर्भाव ऋतुमानाप्रमाणे बदलणारा असून तो एप्रिल महिन्यात सुरू होऊन जुलै-ऑगस्ट महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. गोचिडांची कार्यक्षमता उष्ण आणि दमट वातावरणात जास्त असल्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो, असे सांगण्यात आले.
आजाराचा पूर्वकाळ १० ते २५ दिवसांचा
* सर्वप्रथम थायलेरियाने संक्रमित गोचीड प्रौढ जनावरांच्या कातडीवर चिकटतात. त्यानंतर गोचिडांच्या लाळग्रंथीमध्ये या आदिजीवाची वाढ होऊन स्पोरोझाइट अवस्था तयार होते.
* स्पोरोझाइटची संख्या वाढून गोचिडांच्या लाळेद्वारे जनावरांच्या शरीरात सोडले जातात. स्पोरोझाइट जनावरांच्या लीम्फ पेशींना बाधित करतात. त्यानंतर त्यांची सायझांट ही पुढील अवस्था विकसित होते.
* या अवस्थेत सायझांट लिम्फोसाइट या पांढऱ्या रक्तपेशीत प्रवेश मिळवून प्रजोत्पादन करतात. त्यापासून निघणारे मेरोझाईट लाल रक्तपेशींमध्ये प्रवेश करतात. त्यांची पायरोप्लाझम ही अवस्था विकसित होऊन लाल रक्त पेशींचा नाश होतो. सायझांट लीम्फ संस्थेमध्ये प्रादुर्भाव करून नुकसान करतात. कातडी, यकृतामध्ये लक्षणे दिसून येतात.
गोचीड निर्मूलन ठरतेय फायद्याचे
टिक फिव्हर या आजाराला अटकाव घालण्यासाठी प्रभावी अशी कुठलीही प्रतिबंधात्मक लस नाही. पण जंगल परिसरात चराईसाठी जाणाऱ्या प्रत्येक जनावरांना आयवर मॅक्टीन हे इंजेक्शन दिल्यास गोचीड निर्मूलनासाठी मोठा फायदाच होतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्त मोहीम राबवून जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पाळीव जनावरांना गोचीड निर्मूलनाच्या दृष्टीने विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्याची गरज वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
अठरा दिवसांत तीन मृत बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या तिन्ही मृत बिबट्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात गोचीड होत्या, असे सूक्ष्म निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालाअंती ठोस आणि इत्थंभूत माहिती पुढे येईल.
- डॉ. प्रशांत वरभे, पशुधन विकास अधिकारी, खरांगणा (गो.).