महेश सायखेडे -वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथेल वाघाची शिकार प्रकरणाऱ्याचा छडा लावण्यात वनविभागाला अवघ्या काही तासांतच यश आले आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. आरोपीने चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव (खुर्द) शेतशिवारात ताराच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून वाघाची शिकार केली. यानंतर वाघाचा मृतदेह वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगलात नेत तेथे निर्दयतेचा कळस गाठत वाघाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे.
अविनाश भारत सोयाम (३४) रा. महालगाव (खुर्द) ता. वरोरा जि. चंद्रपूर , असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगलात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह आढळला. यामुळे वर्ध्याचा वनविभागही ॲक्शन मोडवर आला. घनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यानंतर, अवैध शिकारीचे प्रकरण असल्याचा निष्कर्ष काढत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव गाठून संशयित आरोपी म्हणून अविनाश सोयाम याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने वनविभागाला गुन्ह्याची कबुली दिली.
न्यायालयाने आरोपीस ठोठवली तीन दिवसांची वनकोठडीअवैध शिकार करून वाघाच्या मृतदेहाचे निर्दयतेने तुकडे केल्या प्रकरणी वनविभागाने अविनाश सोयाम यास अटक केली आहे. रविवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी अविनाश याला समुद्रपूर येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करून त्याची १७ ऑगस्टपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. वनकोठडी दरम्यान आरोपी आणखी काय माहिती देतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यतावाघाची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अविनाश सोयाम याला अटक केली आहे. असे असले तरी या प्रकरणात आरोपी अविनाश याला आणखी काहींनी सहकार्य केल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात असून आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
'अविनाश'ने सोमवारी केले काम फत्ते -आरोपी अविनाश सोयाम याने चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव (खुर्द) शेतशिवारात तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून पट्टेदार वाघाची शिकार केली. त्यानंतर आरोपीने वाघाचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी ५०० मिटर अंतरावर असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगलात नेल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
चार चमू ॲक्शनमोडवर -१४ तुकड्यांत वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडताच समुद्रपूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. व्ही. बारेकर यांच्या नेतृत्त्वातील एक, नागपूर शिकार प्रतिबंधकचे आशिष निनावे यांच्या नेतृत्त्वातील दुसरा, चंद्रपूर फिरते पथकाचे राजेंद्र घोरुडे यांच्या नेतृत्त्वातील तिसरा तर वर्ध्याचे सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार यांच्या नेतृत्त्वातील चौथा चमू ॲक्शनमोडवर आला. या चार चमूंनी योग्य समन्वय साधून अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावून आरोपी अविनाश याला अटक केली.