बालभाई : खादी सभेला प्रारंभसेवाग्राम : खादी व ग्रामोद्योग संस्थाचे कार्य देशभऱ्यात सुरू आहे. खादीच्या कामांना अधिक दृढतापूर्वक पुढे नेणे आवश्यक आहे. कार्पोरेट संस्था कार्यरत असताना खादी स्थापित नवी समाजरचना निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन खादी मिशनचे संयोजक बालभाई यांनी केले. नई तालीम समितीच्यावतीने शांती भवन येथे शुक्रवारपासून खादी मिशनच्या खादी सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनुभाई मेहता, मगन संग्रहालय समितीच्या डॉ. विभा गुप्ता, राम इकबाल सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना बालभाई म्हणाले, खादीचे कार्य करताना आता खादी कमीशनपासून मुक्त व्हावे लागेल. गांधीजींनी ट्रस्टीची जी कल्पना मांडली यावरच खादीचा विस्तार व्हावा. संस्थांनी खादी कमिशन पासून दुर राहणे हितकारी ठरेल. संस्थानी खादी कमिशनची राशी परत केली. परंतु यापासून संस्थांना मुक्ती मिळाली नाही. ही सावकारी पद्धती असून इंग्रजांच्या गुलामी पेक्षा कमी नाही. यानंतर बोलताना मनु मेहता म्हणाले, याच ठिकाणी देशभऱ्यातील प्रतिनिधी उपस्थित असून येथेच निर्णय व्हावा. याचा प्रस्ताव तयार करुन तो कमिशनला पाठविण्यात येईल. डॉ. विभा गुप्ता यांनी खादी व ग्रामोद्योग संस्थांनी जमिनीपासून कार्याला सुरुवात करावी. बाजारात विदेशी बियाणे असले तरी गाव पातळीवर शेतकऱ्यांना जोडून या कामाला अधिक गती देता येईल. सभेत तामिळनाडू येथील कृष्णा स्वामी यांनी खादी रक्षा यात्रा काढण्याचा प्रस्ताव ठेवला. इंदूभूषण गोयल, बसीनभाई, राजपाल प्रधान, निरंजन, दुधीचंद, बळीराम आदींनी मार्गदर्शन केले. सभेला देशभऱ्यातून २०० खादी संस्थाचे प्रतिष्ठान व कार्यकर्ता सहभागी झाले. सभेचे संचालन पुष्पेंद्र दुबे यांनी केले.(वार्ताहर)
खादी स्थापित समाजरचना निर्माण करण्याची वेळ
By admin | Published: September 17, 2016 2:28 AM