महापारेषणमधील प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांना साकडेवर्धा : जिल्ह्यातील महापारेषण अंतर्गत कार्यरत सुरक्षा रक्षकांवर कंत्राटी पद्धतीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची स्थिती आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांवर विसंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सुरक्षा रक्षकाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कामावर पूर्ववत कायम ठेवण्याची तरतुद करावी, अशी मागणी केली आहे.हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी स्वीकारले. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सुरक्षा रक्षक आंदोलन करणार असल्याची बाब नोंद करण्यात आली. गत ८ ते १० वर्षापासून हे सुरक्षा रक्षक महापारेषण अंतर्गत कार्यरत आहेत. यापुढे मॉस्को कंपनीला कंत्राट दिले असून कंपनीचे व्यवस्थापन कामकाज पाहणार आहे. त्यामुळे महापारेषण कंपनीतील सुरक्षा रक्षकांच्या नोकरीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आजवर या कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिली आहे. कामाचे कंत्राट जरी अन्यत्र दिले असले तरी कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सध्या कर्मचारी आर्थिक विंवचनेचा सामना करीत आहेत. त्यात यामुळे भर पडणार आहे. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा आयटकचे मनोहर पचारे, विभाग अध्यक्ष सुरेश गोसावी, जिल्हा प्रमुख साहेबराव मुन, भालचंद्र म्हैसकर, नितिन कुत्तरमारे, अमीत सुटे, चंद्रशेखर पोहाणे, हर्षवर्धन भगत, महेंद्र सोनुले, शिवा दुबे, सुरेश चतुरकर, प्रफुल चाफले, एम.पी. मुडे आदी कर्मचारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
कंत्राटी पद्धतीमुळे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: July 08, 2015 2:17 AM