महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या प्रकल्पात १६ वाघांचे वास्तव्य आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर झोन ६७ हजार ८१४.४६ हेक्टर आहे. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यातील ४०५५१.३८ हेक्टरवर नेहमीच वाघांची ‘मूव्हमेंट’ असते, तसेच जंगलाची सलगता हे बोरचे वैशिष्ट्य असून, वाघांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचे ठरत असले तरी वाघांसाठी पोषक असलेल्या वर्ध्यात प्रथमच ‘टायगर’ला पिंजराबंद करण्याची वेळ आली आहे.वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन बोरची राणी अशी ओळख असलेल्या कॅटरिना (बीटीआर-३) ची मुलगी पिंकी (बीटीआर-७) या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत वन विभागाच्या तब्बल नऊ, तर बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या तीन चमू पिंकी नामक वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत; पण हिरवा शालू नेसलेल्या जंगलात पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात ती अद्यापही अडकलेली नसल्याचे वास्तव आहे. ही मोहीम राबविणारे कुठल्याही अडचणीला तोंड द्यावे लागले तरी आम्ही पिंकीला पिंजराबंद करू असा विश्वास व्यक्त करीत आहेत, हे विशेष.
युनिफाईड कंट्रोलचा विषय पुढारीही घेई ना- बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाइड कंट्रोल) चा प्रस्ताव धुळखात आहे. पण तो तातडीने मंजूर व्हावा यासाठी जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी पाठपुरवा करीत नसल्याचे वास्तव आहे. बफर झोनचे एक संघ नियंत्रण झाल्यास जंगलाशेजारील गावांना सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवाय वेळीच ठोस निर्णय घेता येणार आहे.
आश्चर्यच... एकसंघ नियंत्रणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच- बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाइड कंट्रोल) चा प्रस्ताव ८ मे २०२० पासून धूळखात आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार आहे. या परिसराचे नियंत्रण हे वन्यजीव विभागाकडे येणार आहे; पण संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील टी-५ वाघिणीचा झाला होता करंट लागून सिंदीविहिरी येथे अपघाती मृत्यू- पिंजराबंद केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील टी-५ वाघिणीला सात वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव परिसरात सोडण्यात आले होते. रेडिओ कॉलर लावण्यात आलेल्या या वाघिणीने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ ५०० किमीचा प्रवास केला; पण तिचा सिंदीविहिरी परिसरात अपघाती मृत्यू झाला होता. आता मोठी खबरदारी घेत पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामात जंगल परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचेच ठरणार आहे.
‘पिंकी’ देतेय दोन्ही सापळ्यांना हुलकावणी- पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी जंगलात पाळीव जनावरांना बांधून दोन ठिकाणी सापळे लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर तब्बल बारा चमू पिंकीचे ठोस लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करीत असून, ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत; पण ड्रोन कॅमेरा असो वा ट्रॅप कॅमेरे यात पिंकी वाघीण कैद झालेली नाही. शिवाय जंगलात लावण्यात आलेल्या सापळ्यांना पिंकी हुलकावणी देत आहे.
तज्ज्ञ वन्यजीव प्रेमींनी सखाेल अभ्यास करून कारणे शोधण्याची गरज- देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प असलेला बोर व्याघ्र प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो; पण याच प्रकल्पात जन्म घेऊन लहानाची मोठी होत बोरच्या कोअर आणि बफर झोनमध्ये मुक्तसंचार करणारी बीटीआर-७ (पिंकी) ही वाघीण मनुष्यासाठी अचानक कशी धोक्याची झाली याबाबतचा तज्ज्ञांनी सखोल अभ्यास करून विविध कारणे शोधण्याची गरज वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.