हिंगणघाट पोलिसांची कामगिरी : काही अद्यापही फरारच लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : येथील शास्त्री वॉर्ड परिसरातील आशिष जवादे (२६) याला टोळी युद्धाच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिन्या गवळी टोळीच्या चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री नागपूर येथे करण्यात आली. आकाश उर्फ टिनू सुभाष गवळी, इरफान खॉ रशिद खॉ पठाण, विशाल तुळशीराम सातघरे, अनिकेत उर्फ गाद्या प्रभाकर गादलवार अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतर काही आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आशिष जवादे याला तू अविनाश नवरखेडे याचा भाऊ नितेश नवरखेडे याच्या सोबत का राहतो? असे म्हणत टिन्या गवळी टोळीतील सदस्य इरफान खान, शाहरुख तसेच आकाश उर्फ टिन्या सुभाष गवळी, गोलू उर्फ शैलेश राणा, सोनु गवळी, विशाल सातघरे, शुभम नाईक, यशवंत कामडी, सर्व रा. हिंगणघाट व अनिकेत गादलवार रा. नागपूर यांनी लोखंडी व प्लास्टिक पाईपने मारहाण केली. याप्रकरणी जवादेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मारेकऱ्यांवर भादंविच्या कलम ३०७, ३२६, ३२४, ३६३, ३६७, ३६८, १४३, १४८,१४९, ५०६ सहकलम १४२, १३५ मुपोका अन्वये गुन्हा नोंद आहे. मारहाणीच्या घटनेच्या दिवसापासून हे आरोपी फरार होते. यातील चार जणांना नागपूर येथून अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी ठाणेदार आर.एस. शिरतोडे व ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक विवेक लोणकर, हवालदार निरंजन वरभे, मारोती उईके, हमीद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
टिन्या गवळी टोळी पोलिसांच्या हाती
By admin | Published: July 12, 2017 2:03 AM