२१ जणांची साक्ष : शिक्षेवर सुनावणी होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धेतच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा निकाल उद्या शनिवारी जिल्हा न्यायालयात लागणार आहे. शनिवारी या प्रकरणात शिक्षेवर सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणातील आरोपीला न्यायालय काय शिक्षा ठोठावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रारंभीपासूनच हे प्रकरण सर्वांकरिता आव्हानच ठरले होते. तपास करताना कुठलाही सुगावा नसताना आरोपीला पकडणे पोलिसांकरिता आव्हान होते. तर काही मोठ्या नावांना वाचविण्याकरिता पोलिसांनी बेबनाव केल्याचा आरोपीच्या वकिलांचा असलेला दावा मोडीत काढत प्रकरणाला न्यायालयात उभे करण्याचे आव्हान सरकारी वकिलांवर होते. हा सर्व प्रकार नरबळीचाच असल्याचे सिद्ध करण्याकरिता न्यायालयात तब्बल २१ साक्षदारांना हजर करण्यात आले. साक्षी पुराव्याअंती रूपेशचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणाची पाहणी खुद्द न्यायाधिशांनी केली. यात न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना न्यायालयात उत्तर देणे शासकीय अभियोक्त्यांना आव्हानच ठरल्याची माहिती आहे. याच काळात वर्धेतील शासकीय अभियोक्तांचा कार्यकाळ संपल्याने प्रकरण हाताळताना काही अडचणी आल्या. यामुळे सदर प्रकरण पूर्वीपासून हाताळणारे नागपूर परीक्षेत्र नागपूरचे अॅड. श्याम दुबे यांना पुन्हा विशेष नियुक्तीवर पाचारण करण्यात आले. त्यांनी पुन्हा सदर प्रकरण हाताळत निकालापर्यंत आणले. शनिवारी या प्रकरणात निकाल येण्याची शक्यता आहे. यात गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेवर युक्तीवाद होणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली. या प्रकरणातील आरोपी आसीफ पठाणला होणाऱ्या शिक्षेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा आज निकाल
By admin | Published: June 17, 2017 1:03 AM