लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छोट्या दुकानातील यूपीआय पेमेंटपासून ते मोठमोठे बैंकिंग ट्रान्सफरदेखील डिजिटल झाले आहेत. त्यामुळे आपले सर्वच डिटेल्स आजकाल इंटरनेटवर असतात. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. ई-मेल कधी फोन, तर कधी सोशल मीडिया अकाउंट यावरूनही हॅकर्स गंडा घालतात. सेक्सटॉर्शन, हनी ट्रॉप, यादेखील काही अशा पद्धती आहेत. ज्यामुळे व्यक्तीचे आर्थिक तसेच मानसिक नुकसानही होते.
शेअर्स व क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक तसेच टास्क फ्रॉडसारखे गुन्हे जास्त प्रमाणात घडत आहेत. अशा प्रकरणात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून आर्थिक फसवणुकीच्या घटनांचे पेव फुटले आहे. दोन ते चार लाख रुपये गुंतवणूक केली की, थेट कोट्यवधी रुपयांचा आभासी नफा दाखविण्यात येतो. मात्र, ती रक्कम ट्रान्सफर वा विड्रॉल करण्यास गेले की काहीच होत नाही. गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणारे स्विच ऑफ होऊन जातात. अलीकडे तर पार्सलमध्ये अमलीपदार्थ आढळल्याचे सांगून पैसे उकळले जात आहेत. आपला मुलगा, मुलगी गुन्ह्यातून सोडविण्याची बतावणी करून देखील फ्रॉड होत चालले आहेत.
पार्सल फ्रॉडएअरपोर्टला तुमचे पार्सल आले आहे. त्यात अमलीपदार्थ आहे किंवा सोने आहे, असे सांगून अनेकांची फसवणूक करण्यात येते. अशा घटनाही जिल्ह्यात घडलेल्या आहेत.
पोलिसांच्या तपासाला येतात मर्यादासायबर फ्रॉडचे कनेक्शन थेट कंबोडिया, अमेरिका, नायजेरिया, फिलिपाइन्स, मलेशिया आदी परदेशात आढळून आल्याने स्थानिक पोलिसांच्या तपासाला अनेकदा मर्यादा येत असल्याचेही दिसून आले आहे.
सहा महिन्यांत २९ जणांची फसवणूकजानेवारी ते जूनदरम्यान सायबर सेलकडे आर्थिक फसवणुकीचे २९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जवळपास एक कोटी एक लाख ६३ हजार ६०० रुपये इतकी रक्कम ऑनलाइन लुटण्यात आली असल्याची माहिती आहे.
सहा महिन्यांत ८४३ ऑनलाइन तक्रारी सायबर पोलिस ठाणे असो की अन्य शहरातील अन्य ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीच्या किमान पाच ते सहा तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त होतात. अनेक जण तर बनदामीच्या भीतीपोटी एफआयआर नोंदविण्यास पुढे येत नाहीत.
फसवणुकीचे अनेक प्रकार१) शेअर मार्केट फसवणूक : शहरातील एका डॉक्टर आणि शिक्षकाला बक्कळ नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख आणि १० लाख रुपयांनी ऑनलाइन फसविण्यात आले. त्यांना आभासी नफा हा मोबाइल स्क्रीनवर दिसत होता. पण, तो मिळाला नाही.२) ऑनलाइन पेड टास्क फ्रॉड : ऑनलाइन पेड टास्क पूर्ण करण्याच्या मोबदल्यात बक्कळ कमिशनचे आमिष दाखवून येथील एका तरुणाची चार लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. अशाप्रकारचे गुन्हे जिल्ह्यात घडलेले आहेत.
आभासी नफा वा प्रलोभनाला बळी पडू नकाअलीकडे शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून आभासी नफा झाल्याचे दाखविले जाते. पार्सलमध्ये अमलीपदार्थ वा आक्षेपार्ह वस्तू आढळल्याची बतावणी करून गंडविले जाते. सध्या शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडही मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा सायबर क्राइमपासून वाचण्यासाठी सतर्कता आत्यंतिक महत्त्वाची आहे. प्रलोभनाला बळी पडू नका.- नुरुल हसन, जिल्हा पोलिस अधीक्षक