आरोग्य विभागाकडून योजनांची अंमलबजावणी : प्रतिसाद देण्याकडे पालकांचे मात्र दुर्लक्ष रूपेश खैरी ल्ल वर्धा जन्म होताच सुदृढ आरोग्याकरिता नवजात बालकांकरिता आरोग्य विभागाच्यावतीने पाच बाबी त्याच्या हक्काच्या म्हणून सांगण्यात आल्या आहेत. यात चार लसी आणि स्तनपानाचा समावेश आहे. या बाबी नवजात बालकांना वेळीच मिळाव्या म्हणून शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्यावतीने योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र त्या योजनांना बालकांच्या पालकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्ह्यात दिसून आले आहे. जिल्ह्यातील नोंदीनुसार सरासरी २ हजार ५०७ बालके या पाच हक्कापासून दूरच असल्याचे दिसून आले आहे. बालकाचा जन्म होताच पहिल्या तासात मुलाला स्तनपान झाले पाहिजे, जन्माताच क्षयरोगाची लस, पोलीओ लस, काविळची लस, आणि के जीवनसत्वाची लस या पाच बाबींचा त्यांच्यात समावेश आहे. या पाच बाबी नवजात बालकाच्या हक्काच्या असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या लसी देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. असे असले तरी त्यांना पालकांकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे; मात्र वर्धा जिल्ह्यात तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे असलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे दिसून आले आहे. या पाच पैकी एकही बाब जिल्ह्यात नोंद असलेल्या बालकांना पूर्णपणे भेटली नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कार्यरत आहेत. या दोनही ठिकाणी १८ हजार ५३४ बालकांची नोंद आहे. या बालकांना राज्याच्या आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार पाच हक्क देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यानुसार त्यांचे कार्य सुरू आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने नोंदी असलेल्या बालकांपैकी सरासरी ५८.३८ टक्के बालकांना या लसी दिल्याची नोंद आहे. यात बाळाचा जन्म होताच ६३.९८ टक्के बालकांना स्तनपानाचा अधिकार मिळाल्याची नोंद आहे. तर क्षयरोगाची लस ७१.३७, पोलिओची लस ७०.६२ टक्के बालकांना देण्यात आली आहे. या तीन लसी देण्याची टक्केवारी जिल्ह्यात समाधानकारक असली तरी काविळच्या लसीसंदर्भात देण्यात असलेले निम्मे उद्दिष्टही पूर्ण करणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला शक्य नसल्याचे दिसून आले आहे. नोंदी असलेल्या बालकांपैकी केवळ ४२.१९ टक्के बालकांनाच ही लस देण्यात आल्याची नोंद झाली आहे. तर क जीवनसत्त्वाची नोंद आरोग्य विभागाकडे दिसून आली नाही. उद्दिष्ट पूर्तीकरिता आरोग्य विभागाची धावपळ ४शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनेतील लसी देण्याकरिता आरोग्य विभागाचे पथक जिल्हाभर नागरिकांच्या दारापर्यंत जात आहे; मात्र त्यांना बालकांच्या पालकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची ओरड त्यांच्याकडून होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बालकांच्या सुदृढ आरोग्याची जबाबदारी एकट्या आरोग्य विभागाची की त्या बालकांच्या पालकांचीही असा प्रश्न येथे समोर येत आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात झालेले लसीकरण ४जिल्ह्यात नोंद असलेली एकूण बालके - १८,५३४ ४जन्मताच स्तनपान मिळालेली बालके - ११,८५८ ४क्षयरोग प्रतिबंधक लस मिळालेली बालके - १३,२२८ ४पोलिसोची लस मिळालेली बालके - १०,३७५ ४काविळरोग प्रतिबधंक लस मिळालेली बालके - ७,८२० बालकाला या पाच लसी वेळीच मिळणे हा त्याचा हक्क आहे. म्हणूनच त्याला नवजात बालकाचे पाच हक्क म्हटल्या गेले आहे. या बालकांना हे हक्क देण्याकरिता आरोग्य यंत्रणा धावपळ करीत आहे; मात्र या बालकांच्या पालकांनीही त्यांची जबाबदारी ओळखून आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. - दुर्र्योधन चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा
आरोग्य हक्कापासून सरासरी २,५०७ बालके दूरच
By admin | Published: December 26, 2016 1:44 AM