प्रशांत कलोडे ल्ल सिंदी (रेल्वे)श्रावण महिन्याच्या शेवटी साजरा होणाऱ्या तान्ह्या पोळ्याची चिमुकल्यांना आवड असते. त्यांच्याकडून सजलेले लाकडी बैल आकर्षक असतात. याच लाकडी बैलांचा वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथील पोळा नावलौकीक मिळून आहे. हा पोळा १४५ वर्षांची परंपरा जपत आहे. सिंदी येथील पोळ्यात असलेले मोठ मोठे लाकडी बैल येथे येणाऱ्यांचे लक्ष वेधणारे आहेत. या बैलांसह करण्यात आलेली रोषणाई या पोळ्याचे महत्त्व वाढविणारी आहे. याच प्रकारामुळे येथील जिल्ह्यातच नव्हे तर अख्या विदर्भात नाव मिळवून आहे. यातही शतकीय परंपरा लाभलेल्या तान्हा पोळ्यासाठी विदर्भातील बघे सिंदीत येतात. यामुळे पोळा शेतकऱ्यांच्या दैवताचा सण म्हणत सिंदीत दिवाळी सणाप्रमाणे पाहुण्याचे आगमन व मेजवाणीचे आयोजन असते. २० हजार लोकवस्ती असलेल्या सिंदी गावात तान्हा पोळ्याची तऱ्हाच न्यारी आहे. १९ व्या शतकाच्या प्रारंभी जयस्वाल कुटुंबाने लाकडाचा मोठा नंदी बनविला. तेव्हापासून सिंदी शहरात हा सण साजरा करण्याचा पायंडा पडला. जयस्वावल यांनी तयार केलेला लाकडी नंदी प्रमाणबद्ध आहे. त्याची उंची शिंगापर्यंत ५४ इंच लांब, ५५ इंच जाडी असून साक्षात बैलाप्रमाणे संपूर्ण अवयव आहेत. तो जिवंत नंदीची जाणीव करून देतो. पुढे १९०२ मध्ये तयार करण्यात आलेला टालाटूले कुटुंबाचा तीन फूट उंचीचा नंदी सिंदी वैभवाची जाण करून देतो. पिंपळवार कुटुंबाच्या दीड फूट उंचीच्या नंदीची १९४२ मध्ये आणखी भर पडली. हा नंदी तयार करण्यास मारोतराव मुठाळ यांना दोन वर्षे लागली. त्यानंतर १९७७ मध्ये ३ फू ट उंच व ६ फूट लांब अशा दीपकसिंह राठोर यांच्या नंदीची सिंदीच्या पोळ्यात भर पडली. सन २००१ मध्ये विकास पेटकर यांनी ५ फूट ९ इंच उंचीचा ११०९ किलो वजनाचा नंदी बनवून सिंदी पोळ्याची शान वाढविली. त्याचप्रमाणे चंद्रशेखर औचट यांची दरवर्षीची उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना आपल्या नंद्यासोबत सिंदी वासियांचे मनमोहुन घेतो. सोबतच शंकर परखड, पुरूषोत्तम मुठाळ, चावरे, रवींद्र बेलखोडे यांच्या नंदी बैलामुळे सिंदीच्या पोळ्यात आणखीच भर पडली. सोबतच नंदी पोळ्याची शान वाढविण्याकरिता विविध क्लब तर्फे अनेक मनमोहक मिरवणुका काढल्या जातात. त्या येणाऱ्यांचे लक्ष वेधणाऱ्या आहेत.
१४५ वर्षांची परंपरा जपतोय सिंदी (रेल्वे) चा तान्हा पोळा
By admin | Published: September 13, 2015 1:55 AM