लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय परंपरा सर्वसमावेशक आहे. या महान परंपरेच्या आधारावर आधुनिकतेकडे वाटचाल करताना काळानुरूप बदल स्वीकारत गतीशीलता प्राप्त करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण स्थितीशील होण्याची शक्यता आहे. परंपरा आपणाला अनुभवाचा आधार देतात व यामुळे आपणास आधुनिक स्वप्ने सत्यात आणणे शक्य होऊ शकते. नवीन पिढीने परंपरा व आधुनिकता यांचा योग्य समन्वय साधायला हवा. परंपरा व आधुनिकता या दोन्ही परस्परपूरक संकल्पना आहे, असे विचार २०१४ चा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा दिला जाणारा ‘ग्लोबल यंग लिडर’ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध वित्त व्यावसायिक व श्रीमन्नारायण यांचे नातू विश्वरूप नारायण मुंबई यांनी व्यक्त केले.बजाज इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पिपरी येथे शिक्षा मंडळाद्वारे ‘आधुनिकता आणि परंपरा’ विषयावर आयोजित ४४ व्या कमलनयन बजाज स्मृती आंतरविश्वविद्यालयीन परिसंवादात बोलत होते. मंचावर शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव, सहसचिव पुरूषोत्तम खेमका, परीक्षक क्यू.एच. जीवाजी नागपूर, सुजाथा नायक आंध्रप्रदेश-तेलंगाना, डॉ. अनिल दुबे वर्धा, परिसंवादाचे समन्वयक डॉ. शेषराव बावनकर व प्राचार्य डॉ. एन.वाय. खंडाईत उपस्थित होते.परिसंवादाची सुरूवात स्व. कमलनयन बजाज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. नारायण पूढे म्हणाले की, भारताने परंपरेबरोबरच आधुनिक विचारांनाही नेहमीच महत्त्व दिले आहे. ज्ञानेश्वर वसुधैव ज्ञानेश्वरांची वसुधैव कुटुंबकम, विश्वात्मक देव ही संकल्पनाही आधुनिक आहे. विनोबांनीही सदैव नित्यनूतनाची कल्पना मांडली आहे. आधुनिक विज्ञान आज जगाची उभारणी करीत आहे. वैचारिक स्वातंत्र्याचे मूल्य आम्हाला आधुनिक विकासाकडे नेण्यात मोलाची भूमिका निभावेल.भार्गव म्हणाले की, भारताला अनेक वर्षे पारतंत्र्यात राहावे लागल्याने स्वातंत्र्यानंतर आधुनिक परिस्थितीशी जुळवून घेताना बरीच तडजोड करावी लागली. या स्थितीत आधुनिकतेच्या प्रभावाखाली येण्यापासून स्वत:ला वाचविणे अत्यंत कठीण होते. आपल्या सारखीच परिस्थिती जपान व चीन या देशांनी अनुभवली आहे. देशहितासाठी तर्कसंगत व स्पष्ट विचारसरणी, विश्वास व राष्ट्रीय बांधिलकी महत्त्वाची आहे. आता ही जबाबदारी नवतरूणांच्या खांद्यावर आहे.डॉ. जीवाजी यांनी कालबाह्य परंपरांना नाकारून विवेकाधिष्ठीत आधुनिकता स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक स्पर्धकाने विषयाचे तार्किक विश्लेषण केले. जिंकण्यपेक्षा स्पर्धेत सहभाग अघिक महत्त्वाचा असतो. वक्तृत्व स्पर्धेत विचार मांडताना विषय मुद्देसूद मांडणे, आवाजातील चढ-उतार, हावभाव व भाषा यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. नायक यांनी आधुनिकता ही व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून असते. वेशभूषेवर नाही. यामुळे आपले विचार स्पष्ट असावे, असे सांगितले.परिसंवादात देशाच्या विविध प्रांतातील २८ स्पर्धकांनी विचार व्यक्त केले. सर्व स्पर्धकांचे सुतमाला घालून स्वागत करण्यात आले. परिसंवादाच्या हिंदी माध्यमाचा प्रथम पुरस्कार त्रिशला पाठक उज्जैन, द्वितीय प्रथम शर्मा हरिद्वार, तृतीय निलाचल हरिद्वार यांना, इंग्रजीचा प्रथम आख्या बाजपायी राजस्थान, द्वितीय स्वाइमा अहमद नागपूर, तृतीय प्रियंका घिल्डियाल गढवाल तर प्रोत्साहनपर पुरस्कार निकिता ओखाडे इंदोर यांना प्राप्त झाला. संचालन प्राचार्य डॉ. खंंडाईत यांनी केले तर आभार डॉ. बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाला पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.
परंपरा व आधुनिकता या परस्परपूरक आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:26 PM
भारतीय परंपरा सर्वसमावेशक आहे. या महान परंपरेच्या आधारावर आधुनिकतेकडे वाटचाल करताना काळानुरूप बदल स्वीकारत गतीशीलता प्राप्त करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण स्थितीशील होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे विश्वरूप नारायण : शिक्षा मंडळाद्वारे परिसंवाद, काळानुरूप बदल स्वीकारत गतीशीलता प्राप्त करणे गरजेच