वर्धा : येथील बजाज चौकात मध्यभागी एक ट्रक नादुरुस्त झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारी झालेल्या या घटनेमुळे वर्दळीच्या या मार्गावर तासभर वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली होती. मात्र त्यावेळी या चौकात वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने वाहनधारकांना वाट काढताना अडचणीचा सामना करावा लागला. यामुळे वाहन चालकांत संताप व्यक्त करण्यात आला.स्थानिक बजाज चौकात वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते. शेकडो वाहने एकाचवेळी येथून मार्गक्रमण करतात. यवतमाळकडे जाणाऱ्या तसेच तेथून येणाऱ्या एसटी बसेस उड्डाणपुलावरूनच येतात. अशातच शुक्रवारी उड्डाणपुलावरुन शहरात येणारा एक ट्रक अचानक रस्त्याच्या मधोमध नादुरुस्त झाल्याने उभा होता. यमुळे वाहतुकीची कोंडी झाली. एसटी बसला मार्गक्रमण करतेवेळी तारेवरची कसरत करावी लागली. नेहमी या चौकात पाच ते सहा वाहतूक पोलीस कार्यरत असतात. मात्र या घटनेच्यावेळी एकही वाहतूक नियंत्रक पोलीस उपस्थित नसल्याने समस्येत भर पडली. ट्रकला रस्त्याच्या कडेला करण्याच्या प्रयत्नात तब्बल तासभर वाहतुकीचा फज्जा उडाला होता. यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांत संताप व्यक्त होत होता. याची वरिष्ठांनी दखल घेत येथे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी) विशेष म्हणजे जड वाहनांना रात्री नऊनंतरच या चौकात प्रवेश असताना हा ट्रक दिवसाढवळ्या या चौकात आला. ट्रक नादुरुस्त झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतुकीच्या नियमाचे जड वाहनधारकांकडून उल्लंघन होत असताना पोलिसांकडून या जड वाहनचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
नादुरुस्त ट्रकमुळे वाहतुकीचा खोळंबा
By admin | Published: June 07, 2015 2:30 AM