रूंदीकरणाचा प्रश्न खितपत : मंजुरीनंतरही प्रक्रिया रखडल्याने कामकाजावर प्रश्नचिन्हवर्धा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत. परिणामी, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारीही शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर एका वाहनात बिघाड आल्याने तब्बल तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागला. या पुलाच्या रूंदीकरणाची प्रक्रिया अद्यापही पूढे न सरकल्याने दररोजच वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दिसते. शहरातून बाहेर जाणाऱ्या आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रथम काही वर्षे रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगत पुलाचे रूंदीकरण रखडले होते. आता रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असताना पुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांची परवानगी गरजेची असते. यामुळे प्रथम राज्य शासनाकडे रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळविण्यात आली. यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर प्रस्तावालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. शिवाय रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. राज्य शासनानेही पुलाच्या रूंदीकरणासाठी निधीची तरतूद केली; पण अद्यापही प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वे आणि राज्य शासनाची मंजुरी मिळून निधीचा मार्ग मोकळा झाल्याने त्वरित हालचाली अपेक्षित होत्या; पण अद्याप कुठलीही पावले उचलली जात नसल्याचेच दिसते. काही महिन्यांपूर्वी रूंदीकरण कामासाठी मोजणी करण्यात आली होती; पण त्या पूढे प्रक्रिया सरकल्याचेच दिसत नाही. आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पूल अत्यंत अरूंद असल्याने दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. या पुलावरून हिंगणघाट, यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाण्याकरिता रस्ता आहे. या अरूंद पुलावर एखादे वाहन नादुरूस्त झाले तर तीनही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागतात. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक वाहन पुलावर नादुरूस्त झाले. यामुळे बजाज चौकातील चारही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय यवतमाळ आणि हिंगणघाट मार्गावरही वाहनांचा रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांना तब्बल एक तास कसरत करून वाहतूक सुरळीत करावी लागली. हा प्रकार नित्याचा झाल्याने रूंदीकरण गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा
By admin | Published: April 06, 2016 2:15 AM