वर्धा : स्टेशन फैल परिसरातून आयटकच्या अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बजाच चौक येथील उड्डाण पुलावर आला असता वाहतुकीचा खोळंबा झाला होता. येथून मोर्चा डॉ. आंबेडकर चौक येथे पोहोचला. न्यायालयाच्या मुख्य द्वाराजवळ पोलिसांकडून त्यांना अडविण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. संघटनेच्या निवेदनानुसार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत दिल्ली येथे १५ फेब्रुवारी रोजी देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले. त्यावर केंद्र शासनाच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात देशातील २४ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल, त्यांना किमान वेतन लागू केले जाईल, अशी ग्वाही दिली होती; पण २९ फेब्रुवारी रोजी सादर अंदाजपत्रकात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक पैशाचीही तरतूद केल्याचे दिसत नाही. ५ वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होत नसल्याने सेविका व मदतनिस, शासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढून विरोध दर्शवित असल्याचे सांगण्यात आले. सोबतच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमारवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कन्हैय्याकुमार हा बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा आहे. तो दिल्ली येथील जेएनयु विद्यापीठ येथे शिक्षण घेत आहे. या घटनेचा निषेधही नोंदविण्यात आला. मागण्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. हा निर्णय अंमलात येईपर्यंत त्रिपुरा शासनाने त्यांच्या राज्यात घेतलेल्या निर्णयानुसार वेतन देण्याची कारवाई करावी. वेतनाच्या मागणीचा निर्णय होईपर्यंत पार्लमेंटरी कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी. अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनात गत ४० वर्षांत ६ वेळा वाढ झाली. त्यांच्या मानधनात नियमीतपणे वाढ करणारी यंत्रणा तयार करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस पार्लमेंटरी कमेटीने केली आहे. महागाई भत्ता व वार्षिक वेतनवाढ द्यावी, अशी शिफारस कमेटीने केली. शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता मिळतो. या धर्तीवर महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व वार्षिक मानधन वाढ द्यावी, अशी मागणी आहे. शिवाय किमान वेतन कायद्याप्रमाणे एनआरएचएम मॅन्यूअल व पीआयपीमधील शिफारशीनुसार आशांना १७,२०० रुपये, गतप्रवर्तकांना २५ हजार रुपये वेतन द्यावे, शालेय पोषणातील कामगारांना किमान वेतन, यवतमाळ औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयावर अंमल करावा, शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्यांना शासन, जि.प. सेवेत रिक्त पदावर सामावून घ्यावे आदी मागण्याही करण्यात आल्या.यावेळी राज्यसचिव दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, असलम पठाण, सुरेश गोसावी, गुणवंत डकरे, ज्ञानेश्वर डंभारे, मैना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, यमुना नगराळे, बबिता चिमोटे, सुजाता भगत, संध्या म्हैसकार, प्रतिभा वाघमारे, वैशाली नंदरे, विणा पाटील, ज्योती वाघमारे, जयमाला बेलगे, रेखा नवले, गीता थूल यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहारतील कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.(प्रतिनिधी)
मोर्चामुळे उड्डाण पुलावर वाहतूक ठप्प
By admin | Published: March 11, 2016 2:38 AM