हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील रेल्वे फाटक क्रमांक १४ च्या निर्माणाधीन उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे़ रखडलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा पचका झाला आहे़ रेल्वेगेट बंद राहत असल्याने दररोज वाहनांच्या रांगा लागत असून अपघातांतही वाढ झाली आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ उड्डाण पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे़ यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातात वाढ झाली आहे़ सदर उड्डाण पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला द्यावे, अशी मागणी नगरविकास सुधार समितीच्या वतीने करण्यात आली़ याबाबत नगर सुधार समितीचे मनोज रूपारेल, राजेश जोशी यांनी खा़ रामदास तडस यांना निवेदन दिले़ यावरून खा़ तडस यांनी त्वरित रेल्वेचे विभागीय महाप्रबंधक ओ.पी. सिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. सिंग यांच्यानुसार राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम करण्यासाठी अडीच तास रेल्वे वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव होता; पण सदर प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने नामंजूर केल्याने नवीन प्रस्ताव पुन्हा रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पुढील चार महिन्यांत काम पूर्ण होणार आहे़ या चर्चेवर खा. तडस यांनी नाराजी व्यक्त करून कामास आधीच मोठा कालावधी लागला असून हे काम आता दोन महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश दिले़ याप्रसंगी आ़ समीर कुणावार, नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, नरेश चुंगडे, राकेश नगरवार, डॉ. मधू गोयनका, डॉ. अशोक मुखी, डॉ. प्रकाश लाहोरी, विजय बाकरे, किशोर दिघे, अॅड. मुरली मनोहर व्यास, विजय अग्रवाल, सरोज माटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़(शहर प्रतिनिधी)
रेल्वे गेटवरील रखडलेल्या उड्डाण पुलामुळे वाहतुकीचा पचका
By admin | Published: April 08, 2015 1:54 AM