पुलगाव : मद्रासहून यवतमाळ मार्गे दिल्लीला भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनर क्र. एचआर ६१ बी- ६०५० च्या चालकाने नाचणगाव बसस्थानकावरील पानटपरीचालकास चिरडले. यात अरविंद देवराव जनबंधू (४५) रा. नाचणगाव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर निखिल अरविंद जनबंधू (१७) हा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. ट्रकचालक सद्दाम हुसेन (२२) व वाहक आसिफ मोहोम्मद रा. अलम्बा (हरीयाणा) या दोघांना अटक करण्यात आली. दिवसभर शांत असलेल्या नागरिकांनी सायंकाळी अचानक येथील रमाई बुद्ध विहारात मृतदेह ठेवत आर्थिक नुकसानिची मागणी केली. शिवाय जोपर्यंत मदत देणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मदतीच्या मागणीकरिता नागरिकांनी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत चार चाकी वाहनांना थांबहून दुचाकी वाहनांना सोडण्याकरिता रस्ता मोकळा केला. यावेळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वृत्त लिहिस्तोवर मृतदेह विहरातच होता. रात्री ८ वाजता नागरिकांच्या मागणीवरून देवळीचे तहसीलदार राजपुरोहीत व उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांच्या मध्यस्थीने व मदतीच्या आश्वासनानंतर प्रकरण निवळले. अखेर रात्री मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस सुत्रानुसार, आठ टन फर्निचर व इतर साहित्याने भरलेला ट्रक भरधाव वेगाने येत होता. नाचणगाव येथील वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक सरळ पानटपरीत घुसला. यात टपरी मालक अरविंद जनबंधू जागीच चिरडल्या गेले. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. जेसीबीच्या सहायाने मुतदेह काढण्यात आला. यात ट्रेलर चालकाविररूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह काढण्याकरिता पोलिसांना शरद सावरकर, लक्ष्मण सोनवने, बंडू धंगारे, रवी प्रगट, राकेश वर्मा यांनी सहकार्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ट्रेलरने पानटपरीसह मालकास चिरडले
By admin | Published: October 05, 2014 11:10 PM