चारूलता टोकस : महिला काँग्रेसच्या वतीने रोजगार मार्गदर्शन शिबिरवर्धा : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्वप्न होते की, महिला या सक्षम बनल्या पाहिजे. याकरिता रोजगार प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. इंदिराजींच्या जयंती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कार्यकारिणी अध्यक्ष चारूलता टोकस यांनी व्यक्त केले.बोरगाव (मेघे) येथील कस्तुरबा महिला बहुउद्देशीय संस्थावतीने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त महिला प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यात सूतकताई केंद्र सुरु करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन चारुलता टोकस यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन प्रतिमा उके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला समन्वयक निलम शेवलेकर, प्रमुख अतिथी म्हणून रोहिनी निंबाळकर, पुष्पा नागपूरे, उषा उताने, उषा थुटे प्रोफेशनल सेल अध्यक्ष निकम, जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे होत्या. मार्गदर्शक म्हणून वंदना फाऊंडेशनचे सागर, सर्जरीकल कॉटनचे प्रशिक्षण देणारे डॉ. शुक्ला, डॉ. यू.डी. देवीकर, आर.जी. धकाते, कुंदा भोयर तसेच महिला कॉँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रास्ताविकात हेमलता मेघे यांनी महिलांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी रोजगार निर्मितीची गरज असल्याचे सांगितले. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. त्यानंतर बोलताना प्रतिमा म्हणाल्या की, महिला स्वबळावर उभ्या राहू शकतात. त्यांना रोजगारातून स्वत:ची प्रगती साधता येते. तसेच निलीमा यांनी महिलांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू करावे. बाजारपेठ उपलब्ध करून देण्याविषयी ग्वाही दिली. त्यानंतर सूतकताईचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. डॉ. शुक्ला व चमूने सर्जरीकल कॉटनचे प्रशिक्षण दिले. यानंतर वर्षभरात विविध उपक्रमांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या युवतींचा सत्कार केला. यात प्रिती कामडी, लक्ष्मी भोकरे, पल्लवी शेलकर यांचा समावेश आहे. कराटे प्रशिक्षक मंगेश भोंगाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्य आदर्श शिक्षक असलेले मोहन मोहीते उपस्थित होते. या शिबिरात सरकीपासून पशुखाद्य बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. यासह महिलांना स्वरक्षणाचे प्रात्याक्षिक मंगेश भोंगाडे दिले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता जया गायधने, पुष्पा लांबट, रंजना पवार, अर्चना मून, संध्या राऊत, पुष्पा खडसे, आशा बुझाडे, छाया पुरके, नलिनी भोयर, कौशल्या लडी, शिला ढोबळे, उज्वला राऊत, भारती खोंड व पदाधिकारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)
महिलांना सक्षम बनविण्याकरिता प्रशिक्षणाची गरज
By admin | Published: September 29, 2016 12:54 AM