रिपाइं (ग.) ची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासह पुलगावातील ऐतिहासिक बुद्ध विद्याविहाराकरिता विषेश निधीची तरतूद करीत त्याचा तात्काळ कायापालट करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून रिपाइं(ग.)च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वीकारले. वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दैनावस्था झाली आहे. उद्यानात ठिकठिकाणी गाजर गवत वाढले आहे. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत नाही. परिसरात बेशरमाची झाडे वाढली आहे. सदर उद्यानासाठी विशेष निधीची तरतूद करीत सौदर्यीकरण करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही खेदाची बाब आहे. ग्रीन वर्धा करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुंदर उद्याने तयार करणे गरजेचे आहेत. ग्रीन वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा कायापालट करण्यासाठी विशेष निधीची तरतुद करीत तात्काळ उद्यानाचे सौदयीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ एप्रिल १९५४ मध्ये पुलगाव येथील बुद्ध विद्याविहाराची कोनशिला ठेवली होती. त्यामुळे या बुद्ध विद्याविहाराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु, अनेक प्राथमिक सुविधांपासून हे बुद्ध विद्याविहार दूर आहे. तरुण-तरुणींना तसेच भावी पिढीला डॉ. आंबेडकर यांच्या विषयीची माहिती तसेच त्यांच्या लिखानाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तेथे अत्याधुनिक वाचनालयाची निर्मिती करीत त्या वाचनालयात डॉ. आंबेडकरांचे प्रकाशित झालेले २२ खंड, संपूर्ण गंथ, साहित्य, पुस्तके ठेवण्यात यावी, अशी मागणीही निवदेनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे यांनाही पाठविण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना रिपाइं(ग.)चे जिल्हाध्यक्ष अॅड. नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष गोकुल पांडे, अॅड. आशीष मेश्राम, बोरकर यांच्यासह रिपाइ(ग.)चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) रा.सू. गवई यांचा पुतळा स्थापित करा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या राष्ट्रीय पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा बिहारचे माजी राज्यपाल व नागपूर येथील दिक्षाभूमीचे शिल्पकार दादासाहेब उपाख्य रा. सु. गवई यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेची भावना लक्षात घेऊन तसेच सर्वधर्म समभावाला उद्देशून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये लोकनेते दादासाहेब उपाख्य रा.सू. गवई यांचा पूर्णकृती पुतळा स्थापित करण्यात यावा, अशी मागणीही रिपाइं(ग.)च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
उद्यानासह बुद्धविहाराचा कायापालट करा
By admin | Published: April 09, 2017 12:30 AM