चिमुकल्यांना पर्वणी : अॅनिमेशन थिएटरचा विदर्भातील पहिला प्रयोग वर्धा : शहरात उद्यानांची वाणवा असल्याने नागरिकांना विरंगुळा मिळावा अशी जागा नव्हती. शहरातील उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले होते. पालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर महावीर बालोद्यानाला विकसीत करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव पास करून घेत या उद्यानाचा कायापालट करण्यात येत आहे. येथे फुट आणि फन झोन तयार केले असून अत्याधुनिक साधनसामग्री व ओपन थिअटर अॅनिमेशनचा विदर्भातील पहिला प्रयोग महावीर उद्यानात साकारण्यात आला आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांचा श्वास घुटमळतोय. त्यांना मोकळा श्वास घेता यावा, आपला थकवा घालवून विरंगुळा मिळावा यासाठी निवांत जागेचा शोध घेण्यात येत होता. मात्र महावीर उद्यानाचा कायापालट झाल्याने नागरिकांना निसर्गरम्य वातावरण शहरातच अनुभवायला मिळणार आहे. कधीकाळी अवैध धद्यांसाठी प्रसिद्ध तसेच कचरा डेपो म्हणून प्रसिद्ध असलले हे उद्यान रखरखत पडले होते. नगर पालिकेने येथे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात फारसा बदल करता आला नाही. दरम्यान हा प्रस्ताव नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल तराळे यांच्याकडे आला. त्यांनी या उद्यानात सुधारणा करण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करण्याची संकल्पना मांडली. या बालोद्यानाला विकसीत करण्याचा निर्णय घेत पालिकेच्या सभागृहात हा ठराव संमत करून घेण्यात आला. नागपूरच्या एका कंपनीच्या माध्यमातून उद्यानात अनेक बदल करण्यात येत आहे. फुट आणि फन झोन नागरिकांना आकर्षित करीत आहे. येथे अत्याधुनिक साधनसामग्री असल्याने बच्चे कंपनीला मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली आहे. इतकेच नाही तर बालोद्योनात टॉयटे्रन, अॅम्युजमेंट पार्क, विशाल फवारा, फोरव्हीलर झुला, व्यायाम करण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, झोपाळे, घसरगुंडी, बुल राईट, हॉर्रर हाऊस, गेम झोन, बाईक राईड, जंपर, गेम झोन तयार करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची प्रतीक्षा संपणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी) उद्यान वर्धेकरांच्या सेवेत रामनगर परिसरातील महावीर उद्यानाचा कायापालट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आहे. येथे सकाळी फिरणाऱ्या व्यक्तिशिवाय नागरिकांना प्रवेश देण्यात येत आहे. हे अत्याधुनिक उद्यान वर्धेकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. सकाळी ११ ते रात्री १० वाजतापर्यंत हे उद्यान सुरू राहणार असून नाममात्र प्रवेश शुल्क ठेवण्यात आला आहे. यातील खेळासाठी तसेच मनोरंजनासाठी शुल्क आकारण्यात आले असून फ्री प्ले झोनही आहेत. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था केली असून वृद्धांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महावीर उद्यानाचा कायापालट
By admin | Published: March 25, 2017 1:10 AM