लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनलॉकनंतर आता एसटीची वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली आहे. राखी पौर्णिमेपासून सर्वच फेऱ्या सुरू झाल्याने २१ ते २८ ऑगस्ट या आठ दिवसांच्या कालावधीत वर्धा विभागाला १ कोटी ७६ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे एसटीचा रुतलेला गाडा आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आल्याने मागीलवर्षी तब्बल पाच महिने एसटीची चाके जागीच थांबली होती. या काळात वर्धा विभागाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला. ऑक्टोबरअखेर एसटीचा गाडा सुरळीत झाला. मात्र, याहीवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच मृत्यूनेही तांडव घातले. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात वर्धा विभागाचे ९ कोटी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची आता पूर्णक्षमतेने धावत आहे. राखी पौर्णिमेपूर्वी फारशी प्रवासी संख्या राहत नसल्याने १८० ते २०० बसेस सोडण्यात येत होत्या. राखीपौर्णिमेपासून सर्वच २१० गाड्या धावत आहेत. २१ ते २८ ऑगस्टच्या कालावधीत वर्धा विभागाला १ कोटी ७६ लाखांचे वाहतूक उत्पन्न मिळाले.
जुलैचे वेतन थकीत
मागीलवर्षीपासून कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊन करण्यात आले. तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याहीवर्षी कोरोनाने मार्च महिन्यापासून कहर केल्याने दीड महिना एसटी बंद होती. त्यामुळे महामंडळाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अनलॉकनंतर एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. एसटीचा गाडा पूर्वपदावर येत आहे. मात्र, अपेक्षित निधीअभावी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिना सुरू होऊनही जुलैचे वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. वेतन तातडीने देण्याची मागणी चालक, वाहक, कर्मचाऱ्यांतून होत आहे.