लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक नागरिकांना ये-जा करण्यासाठी खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील वर्धा-आर्वी, वर्धा-कारंजा, वर्धा-हिंगणघाट, वर्धा-पुलगाव तसेच वर्धा-सेलू या मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करण्यासाठी काही खिळखिळी वाहने सोडली जात आहेत. याच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना भरणा करून नागरिकांची ने-आण केली जात असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. परिणामी, उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात ४०९ टुरिस्ट कॅब आहेत. असे असले तरी दिवाळीच्या तोंडावर रापमच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू करताच काही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी जिल्ह्याबाहेरून टॅक्सी परमिट वाहने वर्धा जिल्ह्यात आणली. यासह काही भंगार वाहनांचा वापर सध्या खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केला जात आहे. प्रत्येक प्रवाशाला चांगली खासगी प्रवासी वाहतूक सेवा मिळावी तसेच कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रयत्न करीत असला तरी अनेक भंगार वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करून नोंदणी झाली की नाही याची शहानिशा करण्याची गरज आहे.
दीडपट भाडे देऊनही जीवाला धोका- खासगी प्रवासी वाहतूक करणारे सध्या मूळ प्रवास भाड्यापेक्षा दीडपट भाडे नागरिकांकडून आकारात आहे. हा मनमर्जी कारभार ग्रामीण भागात सर्वाधिक बघावयास मिळत असून वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. शिवाय प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पण कुणी नियमांना बगल देत असेल तर त्याबाबतची तक्रार नागरिकांनी थेट उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे करावी. वेळीच दोषींवर कारवाई करण्यात येईल.- मो. समीर याकूब शेख, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.
वर्धा-हिंगणघाट मार्गावर काही खासगी प्रवासी वाहने सोडली जात आहेत. पण या वाहनांमध्ये प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून त्यांची ने-आण केली जात आहे. त्यामुळे मोठा धोका पत्कारून या वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या वाहनांनी प्रवास करताना नरकयातनाच सहन कराव्या लागतात.- नरेंद्र चाफले, प्रवासी.
या वाहनांशिवाय पर्याय काय?
काम बंद आंदोलनामुळे रापमच्या बसेस बंद आहेत. त्यामुळे वर्धा-आर्वी तसेच वर्धा-कारंजा मार्गावर धावणाऱ्या काळ्या पिवळीचा आधार सध्या नागरिकांना आहे. पण या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा केल्या जात असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. - सुमीत अवथळे, प्रवासी.