लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम बापूकुटी येथून २३ जुलैला दिल्लीकडे रवाना झालेली ‘महा-देव’ सायकल यात्रा सध्या उत्तरप्रदेशातील आग्रा येथे दाखल झाली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी ही सायकल यात्रा युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात काढण्यात आली असून यात्रेत सहभागी युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व अतिक्रमण धारक दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या विविध मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी साकडे घालणार आहेत.सदर सायकल यात्रेत सहभागी तरुणांसह अतिक्रमण धारकांनी वर्धा, खडकी, नागपूर, सावनेर, जामसावळी, पांढुर्णा, मुलताई, बेतूल, शहापूर, होशंगाबाद, मंडदीप, साची, विधीशा, महळुवा, चंदेरी, दिणारा, ग्वालियर, मोरेना असा १७ दिवस सायकलने प्रवास करून उत्तरप्रदेशातील आग्रा गाठले आहे. १ हजार १०० किमीचे अंतर पूर्ण केल्यानंतर सुमारे ३०० किमीचे अंतर कापूर हे आंदोलनकर्ते केवळ वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अतिक्रमण धारकांच्या समस्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ते महाराष्ट्रातील गल्ली-गल्लीतील अतिक्रमण धारकांचा आवाज दिल्ली दरबारी बुलंद करणार आहेत. शिवाय ते ‘महा-देव’ यात्रेच्या माध्यमातून शासकीय जागेवर अतिक्रमणकरून राहणाऱ्यांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना साकडे घालणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे करीत असून यात्रेत पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशीर ठाकरे, अमित शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत.
वयोवृद्धांसह महिलांचाही सहभागसेवाग्राम ते दिल्ली अशा सुमारे १ हजार ३०० किमीच्या ‘महा-देव’ यात्रेत पाच महिलांसह ६७ वर्षीय वयोवृद्ध आणि १५ वर्षीय बालक सहभागी झाला आहे. मिळेल तेथे रात्रीचा डेरा टाकून या आंदोलनकर्त्यांनी आग्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासादरम्यान काही सायकल स्वारांची प्रकृती खालावली होती. तर काही सायकल चालविताना अनियंत्रित होत जमिनीवर पडल्याने जखमीही झाले. अशा परिस्थितीतही स्वत:ला सावरून हे आंदोलनकर्ते आता दिल्ली गाठायचीच या दृढ निश्चय करून पुढील वाटचाल करीत आहेत.