देवळी : यशोदा नदीच्या अंदोरी वळणावर ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुकाचीवर मागे बसलेला इसम जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान घडली.पोलीस सूत्रानुसार, एमएच ०४ जी ९६६९ ही पुणे-नागपूर ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने देवळीकडे येत होती. दरम्यान यवतमाळ मार्गावरील यशोदा नदीच्या अंदोरी वळणावरून एमएच ३२ ई-८२७५ ही दुचाकी देवळीकडे वळत असताना ट्रॅव्हल्सने तिला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवर मागे बसलेले प्रवीण बापूराव गुंडाने (३५) रा. आपटी हे जागीच ठार झाले. तसेच मोटरसायकल चालक शिवदास महादेव करलुके (४०) व त्यांचा मुलगा रोशन शिवदास करलुके (१४) दोन्ही रा. आपटी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आले.याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक शत्रुघ्न प्रकाश महिंदे (३८) रा. इशांतवाडी, पुणे यास अटक करून सदर वाहन ताब्यात घेण्यात आले. देवळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह विच्छेदनासाठी पाथविला. पुढील तपास ठाणेदार गजानन वासेकर व त्यांचे सहकारी करीत आहे.(प्रतिनिधी)
ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, एक जागीच ठार दोघे जखमी
By admin | Published: April 12, 2015 1:53 AM