अमोल सोटेलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यामध्ये लम्पी आजाराने चांगलेच डोके वर काढले असून एका पाठोपाठ जनावरांना या आजाराची लागण होत असल्याने पशुपालक धास्तावला आहे. अतिवृष्टीने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना आता या जनावरांवरील आजाराने अडचणीत आणले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना आधार देण्याऐवजी तालुका पशुवैद्यकीय विभागाकडून खाजगी व्यक्तींच्या हाताने जनावरांवर उपचार चालविले आहेत. त्यातही उपचाराकरिता शंभर ते दीडशे रुपये पशुपालकांकडून उकळले जात असल्याने ‘टाळुवरचे लोणी खाण्याचा प्रकार’ या विभागाने चालविल्याची ओरड पशुपालक करीत आहे. गेल्या दीड महिन्यापासून लम्पी आजाराने चांगलाच कहर केल्याने शेतकऱ्यांनी तालुका पशुवैद्यकीय विभागाकडे धाव घेतली. एकापाठोपाठ तब्बल ३९ गावांमध्ये या आजाराचा फैलाव झाल्याने ४७० जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाकडून तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाला एकूण २१ हजार १०० लसीचे डोस प्राप्त झाले. हे सर्व डोस जनावरांना देण्यात आले. आतापर्यंत १५ जनावरे दगावली असून जनावरे दगावण्याचा आकडा दिवसेंदिवस वाढताच आहे. आष्टी तालुक्यातील लहानआर्वी, वडाळा, पेठअहमदपूर, शिरकुटनी, आष्टी, परसोडा, बांबर्डा, शेरपूर, नवीन आष्टी, किनी, ममदापूर, पांढुर्णा, चामला, थार, पंचाळा, पोरगव्हाण, टेकोडा वाघोली, जैतापूर, तळेगाव, चित्तूर, रानवाडी, बेलोरा खुर्द, बोरगाव, धाडी, साहूर, जामगाव, किन्हाळा, अंतोरा, शिरसोली, चिंचोली, बेलोरा (बु), माणिकनगर, भारसवाडा, गोदावरी, खडकी, मोई, तारासावंगा, कोल्हाकाळी या गावांमध्ये लम्पी आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाकडे लसीकरणासाठी लससाठा पाठविण्यात आला. तसेच जनावरांना देण्यासाठी अँटिबायोटिक औषध पुरवठा करण्यात आला. मात्र, ही उपाययोजना करण्याकरिता शासकीय पशुधन विकास अधिकारी नसल्यामुळे तारांबळ उडाली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सोनाली कांबळे या एकमेव पदवीधारक डॉक्टर आहे. इतर सर्व डॉक्टर पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आपापल्या हाताखाली खाजगी व्यक्तींना ठेवून त्यांच्या हाताने लम्पीबाधित जनावरांवर उपचार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. खाजगी व्यक्तींना काहीही समजत नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने लसीकरण व औषध दिल्या जात असल्यामुळे सदोष पद्धतीने उपचार सुरू असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे. गोचिड, गोमाशी, मच्छर चावल्याने जनावरांना मोठ्या प्रमाणात गाठी येत आहे. जनावरे दगावल्यानंतर गाय ३० हजार, बैल २५ हजार, गोरा, कालवड १६ हजार रुपायांची मदत दिल्या जात आहे. त्यासाठी जनावरांचा औषधोपचार शासकीय झाला पाहिजे. लसीकरण शासनाकडूनच झाले असावे, लसीकरण केले नसल्यास त्याला शासन जबाबदार राहणार नाही आणि त्या जनावरांना मदत मिळणार नाही, अशा जाचक अटी, शर्ती असल्यामुळे पशुपालक चांगलाच कोंडीत सापडला आहे.
येथील जनावरे वाऱ्यावर सोडून अकोल्यात देताहेत सेवा - साहूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल नानोटकर यांना अकोला येथे तात्पुरत्या स्वरूपात लम्पीच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून पाठविण्यात आल्यामुळे साहूर परिसरातील जनावरांवर उपचार करण्यासाठी कोणीही डॉक्टर नाही. त्यामुळे येथील सहायक पशुधन विकास अधिकारी तात्पुरत्या प्रमाणात कामकाज पाहत असल्याने प्रचंड कसरत करावी लागत आहे.
शासकीय आकडेवारीप्रमाणे आष्टी तालुक्यात आतापर्यंत २६३ जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्याची नोंद आहे. त्यापैकी १५ जनावरे मृत पावले. तालुका पशुवैद्यकीय विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे खाजगी व्यक्तींना काही ठिकाणी उपचारासाठी पाठविले जात आहे. त्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत नसल्याने ते पशुपालकांकडे थोड्याफार प्रमाणात प्रवासासाठी मदत मागतात. शासनाने अतिरिक्त डॉक्टरांना पाठवावे, अशी मागणी केली आहे.- डॉ. सोनाली कांबळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, आष्टी (शहीद).