रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मृत्यू हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. या सत्याशी जोडण्यात आलेल्या कर्मकांडातून समाजाला मुक्त करण्याकरिता गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच मूल्यांचा आधार घेत वर्धेतील स्मशानभूमित मृतदेह आणलेल्या तिरड्या जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरड्यांच्या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे तयार करून वृक्षसंवर्धनाचा चांगला उपक्रम सुरू करण्यात आला आहे.मृत्यूनंतर दोन बांबू आणि १४ काड्यांच्या तिरडीवर मृतदेह ठेवून तो स्मशानभूमित नेण्यात येतो. प्रथेनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानंतर तिरडीचे बांबू आणि त्यातील काड्याही जाळण्यात येतात. या बांबूंचा इतरत्र उपयोग होऊ शकतो अशी कल्पना वर्धेच्या नगराध्यक्षांच्या डोक्यात आली आणि त्यांनी स्मशानभूमित तिरडीचे बांबू जाळण्यास मज्जाव घातला. त्यांच्या या निर्णयाला वर्धेकर नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. यातून जमा झालेल्या बांबूपासून वृक्षसंवर्धक कठडे आणि येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्याकरिता निवारे निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे.स्मशानभूमित हिरवळ निर्माण करण्याकरिता याच बांबूपासून निर्माण करण्यात आलेल्या कठड्यातून वृक्षांचे सर्वधन करण्यात येत आहे. यामुळे वर्धा नगर परिषदेने घेतलेला हा निर्णय सर्वांकरिता एक दिशादर्शक ठरणार आहे.
वृक्षसंरक्षणाचा खर्च वाचलासर्वत्र हिरवळ निर्माण करण्याकरिता शासनाकडून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. वर्धेत यंदा पाच कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. केवळ वृक्षारोपण करून हिरवळ निर्माण होणार नाही तर त्यांच्या संवर्धनासह रक्षणाचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. खर्चाची बचत होणार असल्याने वर्धा नगर परिषदेने घेतलेल्या या निर्णयातून वृक्षसंरक्षण करणे सहज शक्य झाले आहे.तिरडी निर्माण करताना दोन नवे बांबू आणि काड्या विकत आणल्या जातात. अंत्ययात्रा स्मशानभूमित पोहोचल्यानंतर तासाभरापूर्वी विकत आणलेली ही लाकडे जाळण्यात येतात. या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे निर्माण करणे सहज शक्य असल्याचे दिसले. यातून हा निर्णय घेतला. वर्धेत या निर्णयाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.