लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्व सेवा संघाच्या मालकीच्या नालवाडी भागातील जागेवरील चर्मालयाच्या परिसरातील वृक्षतोड प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. या प्रकरणातील संशयीत विनय मुन याला वनविभागाने ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून वनविभागानेही या प्रकरणी विनय मुन याच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल केला आहे.सर्व सेवा संघाच्या मालकीच्या जागेवरील चर्मालयाच्या परिसरातील डेरेदार सुमारे ४० वृक्षाची कुठलीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आल्याचे व तोडण्यात आलेल्या झाडांचे अवशेष पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी हलविले जात असल्याची तक्रार नालवाडीचे माजी सरपंच बाळकृष्ण माऊस्कर यांनी वनविभागाकडे दिली. त्याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तोडलेल्या झाडांचे अवशेष जप्त केले आहे. तर संशयीत आरोपी विनय मुन याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. सुरूवातीला मुन याने वनविभगाच्या कर्मचाऱ्यांनाच कायदा शिकविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून संशयीत आरोपीकडून अधिकची माहिती जाणून घेतली. त्यावेळी मुन याने गुन्ह्याची कबुली दिल्याने या प्रकरणी अवैध वृक्षतोड प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल आठ दिवसानंतर का होई ना पण या वृक्षतोड प्रकरणी वनगुन्हा दाखल झाल्याने सर्व सेवा संघातही खळबळ माजली आहे.महादेव विद्रोहींना बजावणार नोटीसज्या जागेवरील वृक्षांची कत्तल करण्यात आली, ती चर्मालयाची जागा सर्व सेवा संघाची आहे. शिवाय ती जागा भाडेत्त्वावर विनय मुन यांना देण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. त्यामुळे सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांना वनविभागाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.दडपशाही की उचलबांगडी ?सर्व सेवा संघातील पदाधिकाऱ्यांचे मैत्रिपूर्ण संबंध बड्या अधिकाºयांसह केंद्र व राज्य सरकार मधील मंत्र्यांसोबतही आहेत. त्यामुळे हे प्रकरण सर्व सेवा संघाच्या अंगलटी बसल्यास त्यावर पांघरूण घालण्यासाठी अधिकाऱ्याची उचलबांगडी की दडपशाहीचा वापर करण्यात येतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सर्व सेवा संघातील पदाधिकाऱ्यांचे काही मंत्री व बड्या अधिकाºयांशीही मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षकांनी स्वत: करावा. शिवाय तपासात काय सत्य बाहेर येत आहे, याची माहिती जाहीरपेण सांगायला पाहिजे. यामुळे तपासात पारदर्शकता येईल.- बाळकृष्ण माऊस्कर, तक्रारकर्ता तथा माजी सरपंच, नालवाडी.
चर्मालयातील वृक्षतोड; वनगुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM
सर्व सेवा संघाच्या मालकीच्या जागेवरील चर्मालयाच्या परिसरातील डेरेदार सुमारे ४० वृक्षाची कुठलीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आल्याचे व तोडण्यात आलेल्या झाडांचे अवशेष पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी हलविले जात असल्याची तक्रार नालवाडीचे माजी सरपंच बाळकृष्ण माऊस्कर यांनी वनविभागाकडे दिली. त्याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तोडलेल्या झाडांचे अवशेष जप्त केले आहे.
ठळक मुद्देतक्रारीची दखल : लीजधारकाचा कबुली जबाब नोंदविला