वसंत पुरके : आदिवासी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हिंगणघाट : कठोर परिश्रम करण्याची ताकद आदिवासी युवकांमध्ये दिसून येते. मात्र आज आदिवासी युवक स्पर्धेत मागे पडत आहे. याकरिता विज्ञानयुग, तंत्रज्ञान व पुस्तकांसोबत मैत्री करावी, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुकाच्यावतीने स्व. दीपक रामचंद्र मडावी यांचे स्मृतीप्रित्यर्थ आदिवासी गुणवंत विद्यार्थी सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर मडावी, विजय जुगनाके, अनिल मडावी, पं.स. सदस्य दमडु मडावी, समाजसेवक तानबा उईके, रामचंद्र मडावी आदी उपस्थित होते. सर्व समाजातील आदर्श व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन आदिवासी युवक युवतींनी यशाची शिखरे गाठावी, असे आवाहन डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी केले. यानंतर हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सौरभ उईके, वासुदेव कोचे, रेशमा अलोनी, प्रतिक चिडाम, गणेश कुमरे, भारती मडावी, हर्षल कुमरे, लिना कुडमेथे, प्रिया आत्राम, उद्देश वलके, शंकर पुरके, पायल मडावी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंतांच्या पालकांना प्रमाणपत्र, मानचिन्ह, पुस्तकसंच व सहायता राशी देण्यात आली. यानंतर ज्ञानेश्वर मडावी तसेच मान्यवरांनी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन सयाम यांनी केले. प्रास्ताविक महादेव सिडामे यांनी तर आभार तालुका अध्यक्ष अनिल मडावी यांनी मानले. हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यातील समाजबांधव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज, पिपल्स, महिला, विद्यार्थी फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
आदिवासी युवकांनी पुस्तकांशी मैत्री करावी
By admin | Published: July 21, 2016 12:47 AM