वर्धा : शहरात वाहतूककोंडी नित्याचीच झाली असून, बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र, आता वाहतूक पोलीस विभागाने दंडाचे नवीन कायदे लागू केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार दुचाकीवर ट्रिपलसीट दिसल्यास थेट लायसन्स निलंबित होणार असून, सुमारे १० हजार रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनो, सावधान राहून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पोलीस दंडात्मक कारवाई करून देखील काही बेशिस्त चालक वाहतूक नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी नवीन कायदे लागू केले असून, दंडाच्या रकमेतही तिपटीने वाढ केली असून, दंड न भरल्यास थेट न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.
दंड वाढला, तरी मानसिकता ‘जैसे थे’
गृह परिवहन विभाग मुंबई यांनी जारी केलेल्या नव्या वाहतूक दंडाच्या आदेशाने दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या बेशिस्तांना चांगलेच महागात पडणार आहे. मात्र, तरी देखील शहरात अजूनही बेशिस्त चालक दिसून येत आहेत. ही गंभीर बाब आहे.
सोमवारपासून अंमलबजावणी सुरू
वाहतूक नियमांच्या नव्या दंडाचे आदेश सोमवारी वाहतूक विभागाला दिले असून, त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मात्र, नो-पार्किंग झोनमध्ये वाहन उभे केल्यास आता चलान दिली जाणार नसून त्याच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे, धोकादायक वाहन चालविणे अशांवर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.
नियम - दंडाची रक्कम
अपात्र परवाना - १०,०००
विना हेल्मेट - ५००
मोबाईलवर बोलणे ५०० ते १५००
ट्रिपलसीट - १०००
विना लायसन्स - ५०००
फॅन्सी नंबरप्लेट - १०००
ओव्हरस्पीड - ५०००
वाहतुक नियमांचे नव्या नियमानुसार दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे आता आवश्यक राहणार आहे. अन्यथा मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
धनाजी जळक, वाहतूक पोलीस निरीक्षक