लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हिंगणघाट येथील कोचर वार्ड भागातील रहिवासी सचिन बळबंत धारकर यांनी बाबुजी मोटर्स हिंगणघाट याच्या मध्यस्तीने नवीन दुचाकी विकत घेतली. परंतु, गत महिन्याभऱ्यापासून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने त्यांच्या नवीन दुचाकीची नोंदणीच करण्यात आली नाही. परिणामी, त्यांना स्थायी क्रमांकासाठी चांगलीच माथापच्छी करावी लागली. दरम्यानच्या काळात त्यांना वाहनावर क्रमांक नसल्याच्या कारणाने दोन वेळा वाहतूक पोलिसांनी चलान दिले. क्रमांकाबाबत विचारणा केली असता दुचाकी विक्रेत्यासह उपप्रादेशिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही उडवा-उडवीचे उत्तरे देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे धारकर यांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तेथील कर्मचाऱ्यांकडून नेहमीच उलटसुलट उत्तरे दिली जात असल्याने याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महिना लोटूनही वाहनांची नोंदणी होत नसल्याने व नवीन वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. उडवा-उडवीचे उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. सचिन धारकर यांनी २८ मार्चला बाबुजी मोटर्स हिंगणघाट यांच्या मध्यस्तीने सुरूवातीला थोडीफार रोकड देत त्यांनी कर्ज घेत नवीन दुचाकीची खरेदी केली. सुरूवातीला त्यांना दुचाकीसाठी तात्पूर्ता क्रमांक देण्यात आला. परंतु, दुचाकीवर लावलेले कागदी स्टीकर अल्पावधीतच गळून पडले. आठ दिवसांचा कालावधी लोटल्याने त्यांनी स्थायी क्रमांक आला काय याची विचारणा असता लवकरच क्रमांक मिळेल असे सांगण्यात आले. बराच कालावधील लोटूनही दुचाकीसाठी स्थायी क्रमांक मिळाला नसल्याने त्यांनी वर्धा येथील अधिकृत दुचाकी विक्रेत्याचे कार्यालय गाठले. विचारा केली असता दुचाकीचा क्रमांक अद्यापही मिळाला नाही, असे धारकर यांना सांगण्यात आल्याचे धारकर सांगतात. धारकर यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय गाठून विचारा केली असता कर्मचाऱ्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्याचे धारकर यांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षी कारभारामुळे धारकर यांना दोन वेळा वाहनावर क्रमांक नसल्याने कारण दाखवत चलान देण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दुर्लक्षी कारभारामुळे होतो मनस्ताप
By admin | Published: May 10, 2017 12:48 AM