लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अतिशय क्रूरपणे प्राध्यापिकेवर करण्यात आलेल्या पेट्रोल हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच शाळकरी मुला-मुलींनी एकत्र येत शहरातून मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.सोमवारी घडलेल्या या अमानवीय घटनेचे पडसाद मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शहरात उमटले. सर्वपक्षीय मोर्चा असो की रास्ता रोको आंदोलन यात महिला, शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवतींनी सहभाग नोंदविला. मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शांततेने आंदोलन करणाऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी पोलिसांनी बनवलेली मानवी साखळी तोडून थेट उपविभागीय कार्यालयाच्या आत प्रवेश केला.हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमास फासावर लटकवा, अशी एकमुखाने मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांची असंतोषाची खदखद पाहून प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. याशिवाय दिवसभरात शहरात धरणे, निवेदन आणि रास्ता रोकोसारखे आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.स्थानिक नंदोरी चौक परिसरात अंगावर पेट्रोल टाकून जाळल्यानंतर गंभीर जखमी प्राध्यापिकेवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर आज काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून जनआक्रोश पहावयास मिळाला. मोर्चात हजारोंच्या संख्येने स्त्री-पुरुष, लहान मुले नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून उपविभागीय महसूल कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी स्वत: पुढाकार घेत आंदोलनकर्त्यांची बाजू समजावून घेत त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.मोर्चात आमदार समीर कुणावार, माजी नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रा. किरण उरकांदे, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अशोक शिंदे, अनिल जवादे, मो. रफिक, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, संजय डेहणे, दादा देशकरी, आशीष पर्बत, आकाश पाहाणे, लता घवघवे, दीक्षित, घवघवे, प्रदीप जोशी, मिर्जा परवेझ बेग, नवीन भगत, प्रहारचे गजानन कुबडे, अंकुश ठाकूर, श्रीकांत भगत, नीलेश ठोंबरे, शंकर मुंजेवार, अशोक रामटेके, हाजी मोहम्मद रफीक, अनिल भोंगाडे, शांता देशमुख, डॉ. आदर्श गुजर, माजी सैनिक पुंडलिक बकाणे, मनीष देवढे, ब. रा. चव्हाण, तुषार देवढे, अश्विनी तावडे, सुरेश चौधरी, प्रवीण उपासे, नगरसेवक धनंजय बकाने, रूपेश राजूरकर, चंद्रकांत पिठाडे, प्रमोद गोहणे, सौरभ तिमांडे, अनिल भोंगाडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष सहभागी झाले होते.शहरातील अवैध धंद्यांना आळा घालाइतर तालुक्यांच्या तुलनेत हिंगणघाट तालुक्याचा विचार केल्यास महिला अत्याच्याराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याला तालुक्यात सुरू असलेले अवैध व्यवसाय कारणीभूत ठरत आहेत. अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशातच हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेमुळे पोलिसांवरील विश्वास उडण्याची वेळ आली आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.पोलीस ठाण्यासह उपविभागीय कार्यालयात निवेदनांची थप्पीतरुणीला जिवंत जाळणाºया आरोपीवर कठोर कारवाई करण्यासह त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मुख्य मागणीचे निवेदन विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीने हिंगणघाटच्या ठाणेदारांसह उपविभागीय महसूल अधिकाºयांना देण्यात आले आहे. निवेदन देणाºयांमध्ये शिवसेना, महिला काँग्रेस कमिटी, रिपब्लिकन पक्ष (आ.), राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, बहुजन क्रांती मोर्चा, विदर्भ राज्य आघाडी, महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, भीम आर्मी सेना, भारत एकता मिशन, वंचित बहुजन आघाडी, हिंगणघाट बार असोसिएशन यांच्यासह विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचा समावेश आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीच्या निवेदनांचा आज हिंगणघाट पोलीस ठाण्यासह उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात पाऊसच पडला.शाळा-महाविद्यालये राहिली बंदसोमवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी हिंगणघाट बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला येथील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली होती. तर विविध शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती.