ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा : निमगव्हाण घाटातील घटना वर्धा : देवळी तालुक्यातील निमगव्हाण रेती घाटावर मध्यरात्री रेतीची वाहतूक करताना ट्रक उलटला. या अपघातात क्लिनर ठार झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला ताब्यात ट्रक जप्त केला आहे. विनोद माताप्रसाद कैथवास (३५) रा. माताफैल बडनेरा, असे मृतकाचे नाव आहे. ट्रक चालक शैलेश भारतसिंग परिहार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवळी तालुक्यातील वर्धा नदी पात्रावरील निमगव्हाण रेती घाटात दिवरात्र राजरोसपणे बेकायदेशीर रेती उपसा सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील रेती अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नेली जाते. यासाठी नदी पात्रातच रस्तेही तयार करण्यात आले आहेत. याच पात्रातून बुधवारी मध्यरात्री एमएच १२ डीपी ०८१७ क्रमांकाच्या ट्रकद्वारे चालक शैलेशसिंग परिहार व वाहक विनोद कैथवास हे रेतीची वाहतूक करीत होते. दरम्यान, पात्रातील रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने क्लिनर विनोद हा ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाला तर चालक शैलेशसिंग थोडक्यात बचावला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी ट्रक चालक परिहार विरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर अटक झाली नव्हती. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगावला आणला असून तपास सुरू आहे.(कार्यालय प्रतिनिधी) घाटमालकावर गुन्ह्याची शक्यतानिमगव्हाण हा रेतीघाट आसिफ महमद मक्सूद अहमद सिद्दीकी यांच्या नावावर असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म विभागाकडून देण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास घाटातून रेतीचा उपसा करणे बेकायदेशीर असताना जिल्ह्यातील घाटांवर दिवसरात्र रेतीचा उपसा सुरू आहे; पण प्रशासन त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. निमगव्हाण घाटावर बुधवारी मध्यरात्री रेतीची वाहतूक करीत असताना ट्रक पलटी होऊन क्लिनरला जीव गमवावा लागला. यात ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. बेकायदेशीररित्या मध्यरात्री घाट सुरू ठेवल्याने घाट मालकही दोषी असून त्यांच्या विरूद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
रेतीघाटात ट्रक उलटून क्लिनर ठार
By admin | Published: March 03, 2017 1:46 AM