सुधीर खडसे समुद्रपूरशहरातील मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दिवसभर थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. बँड, डीजे, फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज व उघड्यावर टाकलेल्या उष्ट्या अन्नामुळे दुर्गंधी पसरली आहे. हा प्रकार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. समुद्रपूर ते उमरेड मार्गावर प्राध्यापक कॉलनीत सदर मंगल कार्यालय आहे. येथे दररोज होणारे लग्नसोहळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप देणारे ठरत आहे. कार्यालयासमोर वाहनांची पार्कींग व्यवस्था नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी वाहनांची रांग लागते. यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो. नवरदेवाच्या वरातीसोबत बँडवर नाचणारे मद्यधुंद टोळके वाहतुकीचे सारेच नियम धाब्यावर बसवितात. अनेकदा नाचता-नाचता गावातील ज्येष्ठ नागरिकांशी असभ्य वर्तन करून मारामारीपर्यंत प्रकरणे जातात; पण वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. वाहतुकीचा पचका, अन्नाची दुर्गंधी आणि दररोज होणारी भांडणे या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील अन्य भागातील मंगल कार्यालयेही नागरिकांकरिता डोकेदुखीच ठरत आहे. तालुका प्रशासनासह पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत संबंधित सभागृहाच्या मालकांसह संबंधितांना समज देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मंगल कार्यालय झाले डोकेदुखी
By admin | Published: June 01, 2015 2:25 AM