वर्धा : बाजारात यांत्रिकीकरणाने तयार केलेली तुरीची डाळ सर्वत्र उपलब्ध आहे़ या डाळीमध्ये मायेचा ओलावा नसतो, तेलपाणी लावून तुरीवर होणारी प्रकियासुद्धा नसते़ कान्हापुरच्या महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वादिष्ट आणि प्रोटीनयुक्त डाळ तयार केली आहे़ शेतकऱ्यांना तुरी न विकता डाळ करून विकण्याचा नवीन मार्ग महिला बचत गटांनी दाखविला आहे़शेतातील तूर थेट बाजारपेठेत न विकता त्यावर प्रक्रिया करून डाळीच्या स्वरूपात विकल्यास दोन पैसे जास्त मिळतात़ हा संदेश कान्हापूरच्या महिलांनी ग्रामीण भागात रूजविला आहे़ जय भोले शेतकरी महिला बचत गटाची स्थापना करून कान्हापूरच्या प्रगतीशील शेतकरी सविता जीवनराव येळणे यांनी आपल्या अकरा भगिनींना सोबत येऊन गत वर्षी कृषी विभागाच्या सहायाने गावतच स्वत:च्या जागेवर दालमिल सुरू केली़ कान्हापुरसह सुकळी, घोऱ्हाड, सेलू आदी १० ते १२ गावातील शेतकरी शेतातील तुरीवर प्रक्रिया करून महिला बचत गटातून डाळ तयार करण्यासाठी आणत असल्यामुळे सरासरी शंभर क्विंटल दाळ या महिला बचतगटाने तयार केली आहे़ डाळ तयार करत असताना डाळीला तेलपाणी लावून प्रत्यक्ष डाळ तयार करण्यासाठी ४०० रुपये क्विंटल प्रमाणे प्रक्रिया खर्च येत असल्यामुळे सरासरी ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न झाले आहे़ वर्ध्याच्या वर्धिनीने महिला बचत गटाला नवी दिशा दिली़ त्यामुळेच प्रत्येक गावात बचत गटाची चळवळ रूजत आहे़ कान्हापूरच्याच सविता येळणे यांनी येणूताई भुरे, उषा बोरकर, सविता सातपुते, सुशीला गुरूले, मिरा येळणे, माया झाडे, प्रमिला भुरे, अर्चना पेठकर, पुष्पा साकोकार, माया पुंजबैले आदी भगिनींच्या सहकार्याने दालमिलच्या माध्यमातून ग्रामोद्योग सुरू केला़ या उद्योगाला कृषी विभागासह सेंट्रल बँकेनेही मतदीचा हात दिला़ शेतकरी कष्टाने शेती पिकवितो़ त्यानंतर शेतातील धान्य थेट बाजारभावात विकतो़ परंतु त्यावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावेल आणि गावातही सुबकता येईल़ याच उद्देशाने कान्हपूरच्या महिलांनी सुरू केलेल्या या ग्रामोद्योगाचा आदर्श इतर गावांसाठी निश्चितच आदर्शवंत ठरणारा आहे़ (प्रतिनिधी)
तुरीच्या डाळीला मिळाला बचत गटाचा स्वाद
By admin | Published: April 18, 2015 1:58 AM