लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षेविनाही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. दहावीच्या पाठोपाठ आता बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १४ हजार ७११ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. केवळ ५९ विद्यार्थी याही काळात अनुत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याच्या निकालाचे शतक हुकले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८१ मुलं आणि ७३३० मुली असे एकूण १४ हजार ७११ विद्यार्थी बारावीत प्रवेशित होते. यापैकीत ७ हजार ३५० मुलं आणि ७ हजार ३०२ मुली असे एकूण १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची टक्केवारी ९९.५९ राहिली आहे. गेल्या वर्षी परीक्षा न झाल्याने यावर्षी तरी परीक्षा व्हावी, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची ईच्छ होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालामुळे उत्तीर्ण होण्याच्या उत्साहावर काहीसे विरजन पडल्याचे चित्र दिसून आले.
निकालाची मूल्यमापन कार्यपद्धती- कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २०२१ साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची बारावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. २ जुलैच्या शासन निर्णयानुसार मुलांची विषयनिहाय संपादणूक कनिष्ठ महा.मार्फत निश्चित करण्यात आली. विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठन करुन त्यांना विषय शिक्षक व वर्ग शिक्षकांनी केलेल्या मूल्यमापनाचे परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. निकाल समितीचे अंतिम केलेले गुण सीलबंद पाकीटात विभागीय मंडळाकडे जमा करण्यात आले. निकालासाठी दहावी व अकरावीच्या अंतिम गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत विभागीय मंडळाकडे जमा केली.