लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना विषाणूच्या संक्रमण काळातही बँक कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. यादरम्यान त्यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँक ऑफ इंडियाने २० लाख रुपयांच्या विम्याची योजना लागू केली. ही योजना जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहे.बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणाच्या काळात विम्याचे कवच मिळावे यासाठी ऑल इंडिया एससी, एसटी, ओबीसी असोसिएशनचे विदर्भ विभागाचे अध्यक्ष अवचितराव सयाम यांनी पाठपुरावा केला. त्यांनी शासन व प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात बँकांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जन-धन खात्यातील रक्कम काढणाऱ्या बँकेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये कोण कोरोनाग्रस्त असेल याचा अंदाज येत नाही. त्यातही कुणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल याचाही नेम नसल्याने शाखेत कार्यरत कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे तर कुठे मृत्यू झाल्याच्याही घटना घडत आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात देशाची आर्थिक बाजू अतिशय मजबूतपणे बँक कर्मचारी सांभाळत आहेत. केवळ मास्क व सॅनिटायझर लावून कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत पण, बँकेत दररोज होणाऱ्या गदीर्ने धोका आणखीच वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने बँक कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलसारखे ड्रेस व सुविधा पुरवावी, अशी मागणी ऑल इंडिया बँक ऑफ इंडिया कर्मचारी असोसिएशनच्या विदर्भ विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना वीस लाखांचे सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 7:34 PM
कोरोना विषाणूच्या संक्रमण काळातही बँक कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. यादरम्यान त्यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँक ऑफ इंडियाने २० लाख रुपयांच्या विम्याची योजना लागू केली. ही योजना जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहे.
ठळक मुद्देअवचितराव सयाम यांच्या प्रयत्नांना यश